नायर रुग्णालयातील चार जण निलंबित

नायर रुग्णालयातील चार जण निलंबित
Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : नायर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात वैद्यकीय विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी मंगळवारी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांची कूपर रुग्णालयात बदली करण्यात आली. बदली झाल्यानंतर डॉ. मेढेकर यांनी नायर रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांसह चार जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबनाच्या कारवाईचा हा आदेश त्यांनी बदली झाली त्या रात्रीच जारी केल्याचे बोलले जात आहे. या कारवाईनंतर अधिष्ठाता यांनी त्यांच्या निष्काळजीपणाचा ठपका इतरांवर टाकल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून डॉ. मेढेकर यांची बदली करण्यात आली.
कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी महिला, सहायक वैद्यकीय अधिकारी आणि दोन लिपिकांचा समावेश आहे. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका जांभोरे यांचे महात्मा ज्योतिराव फुले जनस्वास्थ्य योजनेचे सीएमएस सेवा बिल थकल्याने निलंबन करण्यात आले आहे. यावर अधिष्ठात्यांच्या सहीशिवाय कोणतीही बिले पुढे जात नसल्याचा खुलासा डॉ. जांभोरे यांनी केला आहे.
कूपर रुग्णालयात पदभार स्वीकारल्यानंतर अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी राजकीय नेत्यांसह रुग्णालयातील भ्रष्ट लॉबीसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. नायर रुग्णालयाच्या भूखंडावर अनेक वर्षांपासून काही राजकीय नेत्यांचा डोळा होता. माझा शिस्तबद्ध कारभार आणि मी विरोध केल्यानेच ही भ्रष्ट लॉबी माझ्याविरोधात सक्रिय झाली. त्यांचे हितसंबंध धोक्यात आल्यानेच त्यांनी माझ्या बदलीसाठी विविध डावपेच सुरू केले. अखेर त्यांना यात यश आले आहे, असा गंभीर आरोप डॉ. मेढेकर यांनी केला आहे.
.......................................
अधिष्ठातांना न कळवता लैंगिक छळाचा गुन्हा
डॉ. मेढेकर यांच्या म्हणण्यानुसार, मार्च २०२४ मध्ये एका विद्यार्थिनीने सहयोगी प्राध्यापकाविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार मला न कळवता अंतर्गत समितीकडे सोपवण्यात आली. हे समजताच मी तातडीने सहयोगी प्राध्यापकाची अंतर्गत बदली केली. प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्याचा अहवाल पाठवला. या सर्व प्रक्रियेत विनाविलंब कारवाई करण्याची तत्परता दाखवली. त्यानंतर काही विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थींना प्रलोभन दाखवून सोबत नेण्यात आले.
..............................
काय आहे प्रकरण?
एमजेपीजेवायच्या कार्डिओलॉजी विभाग, कार्डिओलॉजी सर्जरी आणि ऑर्थोपेडिक्स विभागात मोठ्या संख्येने रुग्णांचे प्रवेश वर्षभराची बिले प्रलंबित होते. याबाबत सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका जांभोरे दुर्लक्ष करत होत्या. या प्रकरणाची चौकशी केली असता किरकोळ कारणावरून ही देयके प्रलंबित ठेवण्यात आल्याचे आढळले. पुढे, ‘एमजेपीजेवाय’अंतर्गत निविदा न काढता, चढ्या दराने वैद्यकीय साहित्याचा पुरवठा व उपकरणे खरेदी करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आढळल्याने नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांना पदावरून निलंबित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com