‘बदलापूर’च्या विश्वस्तांचा मुक्काम तुरुंगातच तर दुसऱ्यात पोलिस कोठडी

‘बदलापूर’च्या विश्वस्तांचा मुक्काम तुरुंगातच
तर दुसऱ्यात पोलिस कोठडी
Published on

कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : बदलापूर येथील चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी शाळेच्या विश्वस्तांना ठाणे गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली. त्यानंतर गुरुवारी (ता. ३) कल्याण न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने त्यांना एका गुन्हात जामीन दिला, तर दुसऱ्या गुन्ह्यात पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे तुषार आपटे आणि उदय कोतवाल या विश्वस्तांचा मुक्काम तुरुंगात राहणार आहे.
बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचारप्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती; परंतु शाळेचे विश्वस्त तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला; मात्र हा प्रकार उघडकीस येताच, हे दोघेही मागील दीड महिन्यांपासून फरार झाले होते. अटकेची टांगती तलवार डोक्यावर असता, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी कल्याण सत्र न्यायालय, तसेच उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळत विश्वस्तांना अद्याप अटक का केली नाही, म्हणून पोलिसांना फटकारले होते. त्यानंतर २४ तासांत ठाणे गुन्हे शाखेने बुधवारी आपटे आणि कोतवाल यांना कर्जतमधून अटक केली. पोलिसांनी गुरुवारी दुपारी त्यांना कल्याण सत्र न्यायालयात हजर केले.
---
न्यायालयात काय झाले?
- गुन्हे शाखेच्या वतीने दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. लैंगिक अत्याचाराबाबत समजल्यानंतरही शाळेच्या विश्वस्तांनी पोलिसांना कळविले नाही. घटनेच्या दिवशी शाळेतील सीसीटीव्ही बंद होते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यांची चौकशी करणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद वकील अश्विनी भामरे-पाटील यांनी केला.
- परंतु, जामीनपात्र पोक्सो कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात न्यायाधीशांनी इतर प्रकरणाचा दाखला देत दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपींच्या वतीने वकील संजयकुमार धनके यांनी लगेच जामिनासाठी अर्ज करण्यात आला आणि न्यायाधीशांनी तो मंजूरही केला.
- याच प्रकरणातील दुसऱ्या पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हे शाखेने पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायाधीशांनी ही विनंती मान्य केली. त्यानुसार गुन्हे शाखेने आपटे आणि कोतवाल यांना अटक केली. याप्रकरणी त्यांना शुक्रवारी पुन्हा न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com