

वसंत जाधव ः सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ४ ः कळंबोली सर्कलच्या अद्ययावतीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी ७७०.४९ कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे. त्यामुळे कळंबोली जंक्शनची वाहतूक कोंडीतून आता कायमची सुटका होणार आहे.
नवी मुंबईतील कळंबोली सर्कलवर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. पनवेल-उरण ते मुंबई-ठाणेकडून जेएनपीएकडे जाणाऱ्या वाहनांची कळंबोली सर्कलवर ये-जा सुरू असते. त्यामुळे अवजड कंटेनर, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे कळंबोली एमजीएम सर्कल येथून रात्रंदिवस मार्गक्रमण सुरू असते. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच पनवेल- उरण- जेएनपीएकडे जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमाने उड्डाणे घेऊ लागल्यानंतर मुंबईतील ‘एअर ट्रॅफिक’ कमी होईल; मात्र नवी मुंबईतील रस्त्यावरील कोंडी वाढू नये, या पार्श्वभूमीवर कळंबोली वाहतूक सर्कल विकसित करणे काळाची गरज होते. जेएनपीए, सिडको आणि राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने एकत्र येऊन प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या सीमाभागातील रस्ते विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामधील पॅकेज चारपर्यंतची कामे पूर्ण झाली असून पॅकेज पाचमध्ये कळंबोली सर्कल आणि विमानतळाच्या बाजूकडील एक्झिटवर चक्राकार बेट तयार करण्याचे प्रस्तावित होते. यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा सल्लागार नियुक्त केला आहे.
------------------------------------------------------------
लवकरच निविदा प्रक्रिया
जेएनपीए बंदराकडे जाणारी अवजड वाहतूक, विमानतळावरून थेट पुण्याकडे जाणारी वाहतूक थेट मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर जाता येईल, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे रोटरी प्रकारचे सर्कल विकसित करण्याचे नियोजन आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता देताना ७७० कोटींची तरतूद केली आहे. या कामाची लवकरच निविदा प्रक्रिया होणार असल्याचे संकेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत.
------------------------------------------------------------------
प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा
कळंबोली जंक्शनवरील वाहतूक कोंडीतून पनवेलकरांची मुक्तता करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली होते. त्यानंतर पनवेल-उरण परिसरात असलेले विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसह अत्यंत वर्दळीचे असलेले कळंबोली सर्कल विकसित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी कळंबोली सर्कलच्या विस्तारासाठी बैठक घेतली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.