कल्याण स्कायवॉकवर गर्दुल्ल्यांचा अड्डा
कल्याण स्कायवॉकवर गर्दुल्ल्यांचा अड्डा
डोंबिवली, ता. ५ (बातमीदार) : रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना स्टेशन परिसरातील गर्दी टाळण्यासाठी अनेकजण स्कायवॉकवरून जाण्याचा विचार करतात; मात्र या पुलावर गर्दुल्ल्यांनी कब्जा केल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गर्दुल्ले उघड्यावरच लघुशंका करत आहेत. त्यामुळे प्रवाशांना आपल्या माना वळवून दुसरीकडे पाहत जावे लागत आहे. तर, महिलांमध्ये यामुळे असुरक्षिततेचे वातावरण आहे. स्कायवॉकवर गर्दुल्ले, भिकारी ठाण मांडून असतात. मुख्यता मोहम्मद अली चौकात उतरणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दुल्ले बसलेले असतात. तसेच, विक्रेतेसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे स्कायवॉकवरून ये-जा करताना प्रवाशांची गर्दी होत आहे. या समस्येकडे पालिका प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का, असा सवाल प्रवासी करीत आहेत.
कल्याण स्टेशन परिसर हा कायम प्रवाशांनी गजबजलेला असतो. स्टेशन परिसरात रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी, रिक्षाचालक, फेरीवाले, खरेदीसाठी येणारे ग्राहक आदींची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पालिका प्रशासनाच्या वतीने स्कायवॉक बांधला आहे. रस्त्यावरील गर्दीतून जाण्यापेक्षा प्रवासी पुलावरून पायी चालत जातात; मात्र या स्कायवॉकवर भिकारी, गर्दुल्ले झोपलेले असतात, तर कोठे कोणी कसेही अस्ताव्यस्त पडलेले असतात. काही गर्दुल्ले तर प्रवाशांसमोरच उघड्यावर लघुशंका करतात.
प्रवाशांना शिवीगाळ
गर्दुल्ल्यांना प्रवाशांनी हटकले तर ते शिवीगाळ करतात. त्यामुळे स्कायवॉक प्रवाशांच्या सोयीसाठी बांधलेला आहे; मात्र त्याचा वापर करणे कठीण होत असल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. एकीकडे पालिका प्रशासन कल्याण स्टेशन परिसर फेरीवालामुक्त, तसेच येथे अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे स्कायवॉकवर गर्दुल्ले, भिकारी यांच्या किळसवाण्या गोष्टी सुरू असतात. या सर्वांचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

