काळबादेवीच्या दर्शनाला कष्टकऱ्यांची गर्दी
काळबादेवीच्या दर्शनाला कष्टकऱ्यांची गर्दी
नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
दिनेश चिलप मराठे
मुंबादेवी, ता. ५ (बातमीदार) : काळबादेवी परिसरातील मुख्य मार्गाला लागून असलेल्या पुरातन आणि टुमदार काळबादेवी मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. दिवसभर घाम गाळणाऱ्या आणि कष्टाची मिरची- भाकर खाणारे हातगाडी कामगार, हमाल आणि नाका कामगारांची काळबादेवी मातेच्या चरणी मांदियाळी पाहायला मिळत आहे.
दक्षिण मुंबईचे व्यापारी केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळबादेवी मातेचा नवरात्रोत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा होत आहे. येथील स्वदेशी कापड मार्केट, तांबाकाटा, सर्जिकल मार्केट, कपडा मार्केट व अन्य मार्केटमधील व्यापारी वर्ग आणि कष्टकरी कामगार देवीसाठी नारळ, खोबरे, वाटी, मिठाई, प्रसाद आणि चोळी-खणाचा मान देताना धन्यता मानत आहे.
काळबादेवी मंदिराजवळ मूळजी जेठा मार्केट, स्वदेशी मार्केट, कापड मार्केट ही स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची कापडाची विक्री केंद्रे असलेले मार्केट आहेत. एकीकडे पांढऱ्याशुभ्र गाद्यांवर तक्क्याच्या लोडांना टेकून अगदी राजेशाही थाटात इथे व्यापारी व्यवसायासाठी अगदी प्रसन्न मुद्रेने बसलेले पाहायला मिळतात. तर, दुसरीकडे घामाने भिजलेले काही ऐन विशीतले तर काही अगदी साठीपार झालेले वयस्क काका कापडाचे तागेच्या तागे हातगाड्यांवरून नेताना पाहायला मिळतात.
रघुनाथ कृष्णा जोशी हे ब्रिटिश काळातील दक्षिण मुंबईतील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व होते. शिवाय, ते एल्फिन्स्टन कॉलेजच्या ट्रस्टवर प्रतिनिधी होते. पूर्वी असलेले हे उत्तुंग मोठे मंदिर इंग्रजांनी ट्राम रेल्वेसाठी हलवले आणि ट्रामसाठी जागा हवी, यासाठी मोकळी करून घेतली. उरलेल्या जागेमध्ये म्हणजेच जवळपास ६०० स्क्वेअर फूटच्या जागेमध्ये आताचे हे काळबादेवीचे मंदिर उभे आहे. मंदिरात अडीच फुटाच्या आसपास मध्यभागी काळबादेवी म्हणजेच कालिका मातेची मूर्ती विराजमान आहे. तिच्या दोन्ही बाजूला उजवीकडे सरस्वती तर डावीकडे लक्ष्मी विराजमान आहे. ही आदिशक्ती महिषासुरमर्दिनी दुर्गेची शक्तिरूपे आहेत.
प्रतिपदेपासून ते दसऱ्यापर्यंत देवीची दैनंदिन शोडषोपचारे पूजाअर्चना करण्यात येते. नैवेद्य संपूर्णतः शाकाहारी असतो. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ तीन वेळ आरती करण्यात येते. या विभागात येणारी जुनीजाणती मंडळी वेळात वेळ काढून या दहा दिवसांत काळबादेवीच्या चरणी लीन होत असतात. त्यांच्या मनातील साकडे घालीत असतात. विशेष म्हणजे, तुम्ही जो काही प्रसाद येथे अर्पण करता, मग त्यात नारळ, हळद-कुंकू, अक्षता, वेणी, फुलं, हार हे अर्पण झाल्यानंतर पुन्हा तेच तुम्हाला देण्यात येते.
देवीचा मांगल्यमय आशीर्वाद मिळावा, यासाठी दहा दिवस येथे भाविकांची मोठी गर्दी असते. खरेतर या ठिकाणी कष्टकऱ्यांचा वावर अधिक असतो. त्यात कापड बाजारात काम करणारे कामगार, हमाल, गाडीवान, हातगाडी ओढणारे, विविध व्यावसायिक आणि दुकानदार यांचा वावर फार मोठा असतो.
होमहवनदिनी कामा हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल, जिटी हॉस्पिटल येथील डॉक्टर्स, नर्सेस आणि अन्य कर्मचारी वर्ग येथे देवीदर्शन आणि होमात नारळ अर्पण करण्यासाठी आवर्जून येत असतात, असे येथील भाविक प्रिती मनोज अमरे यांनी सांगितले.
गुजराती, मारवाडी आणि मराठी भाषिक ब्रिटिश काळाच्याही आधीपासून येथील देवीला मानाची साडी-चोळी अर्पण करतात. येथून जवळपास असलेला कुंभारवाडा, गिरगाव, खेतवाडी, डोंगरी, उमरखाडी आणि प्रिन्सेस स्ट्रीट येथील मराठी भाषिक दर्शनासाठी येऊन नवसपूर्ती करतात.
२३९ वर्षे जुने मंदिर
या मंदिराची निर्मिती १७८५ साली करण्यात आली आणि आझाद मैदान (कॅम्प मैदान) येथे असलेल्या मंदिरात दीडशे वर्षांपूर्वी स्थापित असलेली मूर्ती तेथून १७८५ साली रघुनाथ कृष्णा जोशी यांनी स्थलांतरित करीत त्यांनीच नवीन बांधलेल्या काळबादेवी येथील मंदिरात आणून पुनर्स्थापीत केली. आज या मंदिराला जवळपास २३९ पूर्ण वर्षे झाली, असे रघुनाथ जोशी यांच्या आताच्या पिढीतील मंदिराचे व्यवस्थापन पाहणारे त्यांचे वंशज नितीन जोशी यांनी सांगितले.
कोहळ्याचा बळी
या मंदिरामध्ये पूर्वांपार जी परंपरा होती ती आजही अष्टमीच्या होमाला पाळली जाते. होमहवनासाठी वेळी पूर्णाहुती देण्यापूर्वी होणाऱ्या क्षेत्रपाल बलिदानासाठी कोहळ्याचा बळी देण्यात येतो. यामागे एकच मुख्यत्वे कारण आहे ते म्हणजे जीव हत्या रोखणे होय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

