पालघरनगरीत विकास गंगा!

पालघरनगरीत विकास गंगा!

Published on

प्रसाद जोशी : सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. ५ : आदिवासी, अप्रगत, बेराेजगार अशी अनेक वर्षांपासून असलेली ओळख पुसून टाकण्यासाठी पालघर जिल्हा तयार झाला आहे. गेल्या काही महिन्यांत कोट्यवधींचे प्रकल्प हे पालघर जिल्ह्यात कूच करू लागले आहेत. त्यामुळे रोजगार निर्मितीसह उत्पन्नवाढ व्यवसायाला गती आणि त्यातून पालघरचा विकास होणार, अशी घोषणा केंद्र आणि राज्य सरकारने केली आहे. वाढवण बंदर, टेक्स्टाईल पार्क आणि विमानतळाची उभारणी याचाही समावेश असल्याने विकासाच्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल असल्याचे दिसत आहे.

पालघर जिल्ह्यात विकासाच्या दृष्टीने केंद्र आणि राज्याचे अनेक प्रकल्प समोर येत आहेत. वाढवण बंदराने आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धी, याव्यतिरिक्त वस्त्रोद्योग व विमानतळ अशी तिहेरी सांगड घातली जाणार आहे. त्यामुळे पालघरच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात पालघर जिल्ह्यात विकासाची गंगा धावणार आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.

गेल्या काही वर्षांत भारतातील वस्त्राेद्याेग देशातून शेजारच्या बांगलादेशात गेला हाेता. त्याठिकाणी अल्प मजुरी असल्याने कमी खर्चात उत्पादननिर्मिती हाेती. त्यासाठी लागणारा कच्चा मालदेखील भारतातून पाठवला जात हाेता. तेथील कामगार कपडे तयार करत असल्याने त्यांना राेजगार मिळत हाेता. हाच माल भारतात आयात करत विक्री केला जातो; मात्र काही दिवसांपूर्वी त्या देशात उलथापालथ झाल्यावर देशातील उद्याेजकांची पुन्हा भारताकडे नजर वळली आहे. हे उद्योजक भारतातच हा व्यवसायवाढीसाठी प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष सवलती देण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यामुळे पालघरमध्ये टेक्स्टाईल पार्क आले तर येथील बेराेजगारांना रोजगार मिळू शकतो; परंतु याला काही स्थानिकांचा विरोध सुरू झाला आहे.

वाढवण बंदरासाठी एकूण ७६ हजार कोटींची तरतूद केंद्र सरकारने केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील हे बंदर डहाणू तालुक्यात होत आहे. यात कंटेनर पोर्ट, पायाभूत सुविधा, व्यवसाय करण्यासाठी सुलभ वातावरण, जागतिक व्यापारात आघाडी, रोजीरोटीचे साधन, स्थानिक तरुणांना प्रशिक्षण व नोकरी, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजीदेखील घेणार, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

वाढवण, दिघी बंदरामुळे काेकणच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी शक्यता आहे. वाढवण बंदर हा पालघरसाठी गेमचेंजर प्रकल्प ठरू शकताे. त्यामुळे पालघरच्या जनतेला सर्वात जास्त फायदा होणार आहे, असे विधानदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नाशिक, सिंधुदुर्गात विमानतळ उभारले आहे. या मधोमध असणाऱ्या पालघर जिल्ह्यातदेखील विमानतळ होणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे भविष्यात पालघरला विमानतळाची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे येथील नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. विमानतळ उभारणीनंतर जिल्ह्यातील पर्यटनस्थळ विकास व स्थानिकांना त्यातून व्यवसाय, रोजगार साधन प्राप्त होऊ शकते. अद्याप विमानतळाची जागा निश्चित नसली तरी मात्र घोषणा केल्यामुळे योग्य जागेची पाहणी आणि निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.

एकीकडे स्थानिकांना प्रकल्प विरोध होत असताना दुसरीकडे पालघरसह देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी केंद्राने अनेक प्रकल्प हे जिल्ह्यात आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात प्रकल्पामुळे नेमका किती फायदा जिल्हावासीयांना होणार, हे स्पष्ट होणार आहे.

निसर्गाला बाधा निर्माण होण्याची भीती
एकीकडे विकासाची गंगा वाहणार, असे बोलले जात असले तरी मात्र स्थानिकांना पारंपरिक व्यवसाय, रोजगार, जमिनी नष्ट होण्याची, तसेच निसर्गाला बाधा निर्माण होण्याची भीती सतावू लागली आहे. त्यामुळे स्थानिकांकडून विरोध होत आहे तर केंद्र आणि राज्यांनी जिल्ह्याचा विकास व्हावा, यासाठी नवे प्रकल्प आणले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com