मोर्चातून विरोधाची एकी

मोर्चातून विरोधाची एकी
Published on

पालघर, ता. ६ (बातमीदार) : तालुक्यातील माहीम, टोकराळे येथे ८०० एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या टेक्स्टाईल पार्कच्या विरोधात माहीम ग्रामपंचायतीसह नागरिकांनी विरोधाचा पवित्रा घेतला आहे. या टेक्स्टाईल पार्कच्या विरोधात जनआंदोलन उभारून मंगळवारी (ता. ८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या टेक्स्टाईल पार्कचा विरोध करण्याचा निर्णय माहीम ग्रामपंचायतीने घेतला आहे.

पालघर तालुक्यातील माहीम, टोकराळे येथील ८०० एकर जमीन महसूल विभागाच्या ताब्यात आहे. या जागेवर एका कंपनीकडून टेक्स्टाईल पार्कचा प्रकल्प उभारणीच्या हालचाली चालू आहेत. या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी माहीमच्या सरपंच प्रीती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सभा घेण्यात आली. या वेळी माहीम विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन विवेकानंद ठाकूर, कृष्णदत्त पाटील, आदिवासी एकता परिषदेचे दत्ताराम करबट, अजय ठाकूर, विकास मोरे, माजी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि केळव्यातील विविध संस्थेचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातून माहीममधील प्रकल्प जागेची मोजणी करताना ग्रामपंचायत व लगतचे कब्जेदार यांना विश्वासात न घेतल्याने महसूल विभागाचे अधिकारी व तलाठी यांना नागरिकांनी धारेवर घेतले. या प्रकल्पात पेट्रोलियमच्या माध्यमातून धाग्याची निर्मिती करण्यात येणार आहे. आधीच माहीम, बिडको येथील कंपनीमुळे परिसर प्रदूषित झाला आहे. या महाकाय प्रकल्पामुळे परिसरातील प्रदूषण अतिउच्च पातळीवर जावून परिसराची मोठी हानी होईल, असेही मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

यापूर्वीही प्रकल्पाला विरोध
रिलायन्स कंपनीने मागणी केलेल्या माहीम येथील सर्व्‍हे क्रमांक ८३५ मधील ६२.९८ आणि सर्व्‍हे क्रमांक ८३६ मधील ११७.८३ या जागेसाठी माहीममधील नागरिकांनी बहुउद्देशीय सामुदायिक शेती संस्थेच्या माध्यमातून मागणी केली होती. याला सरकारकडे मंजुरी मिळाली होती, मात्र सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याच ठिकाणी सरकारने ओएनजीसी कंपनीचा बॉटलिंग प्रकल्प आणण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र नागरिकांच्या तीव्र विरोध लक्षात घेता हा प्रकल्प रद्द करण्यात आला होता.

नागरिकांच्या विरोधाचे कारण
सद्य:स्थितीत येऊ घातलेल्या रिलायन्स टेक्स्टाईल या प्रकल्पासाठी याच जागेची मागणी केली आहे. या प्रकल्पातून कोट्यवधी लिटर सांडपाणी खाडीच्या माध्यमातून समुद्रात सोडण्यात येणार आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण, तसेच वायू प्रदूषण होणार आहे. निसर्गसमृद्ध केळवे माहिमचा परिसर बेचिराख होण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

विस्थापितांना जमीन देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यात येऊ घातलेल्या मोठ्या प्रमाणात विकास प्रकल्पामुळे नागरिकांचे विस्थापन होणार आहे. कोस्टल रोड, बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, मुर्बे जेटी व इतर प्रकल्पातून विस्थापित होणाऱ्या, तसेच परिसरातील भूमिहीन लोकांना ही जमीन देण्यात यावी, अशी मागणी या सभेत करण्यात आली.

पर्यटनासाठी घातक
केळवे माहीम परिसर हा निसर्ग सुंदर परिसर असल्याने या ठिकाणी पर्यटनाला मोठा वाव आहे. केंद्र सरकारने गुजरातपासून गोव्यापर्यंत संपूर्ण किनारपट्टीवर जाहीर केलेल्या १३ पर्यटन विकास केंद्रांमध्ये केळवे माहीम या विभागाचा समावेश आहे. मात्र हा पर्यावरणाला घातक प्रकल्प आणलाच कसा, असा जाब उपस्थित नागरिकांनी प्रशासनाला विचारला.

विरोधकांनाच निवडणुकीत मदत!
रिलायन्स टेक्सटाईल पार्क या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी केळवे, माहीम, केळवे रोड, तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. आचारसंहिता लागण्याच्या आत मंत्रिमंडळाने हा निर्णय कायम होण्याच्या आधी प्रशासकीय पातळीवर, राजकीय पातळीवर, तसेच न्यायालयीन पातळीवर या प्रकल्पाविरोधात तीव्र विरोधी भूमिका घेण्याचे ठरले आहे. यासाठी सत्तेत असलेल्या पक्षाच्या पदाधिकारी नेत्यांच्या माध्यमातून नागरिकांच्या भावना राजकारण्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत, तर विरोधी पक्षांनाही या चळवळीत सहभागी करून प्रकल्पाला विरोधासाठी मदत केली तरच निवडणुकीत मदत करू, असा भूमिका घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com