पावसाच्या भीतीने भातपीक कापणीला सुरुवात
कासा, ता. ९ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी भातपिकाच्या कापणीला सुरुवात केली आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला परतीचा पाऊस ओसरल्यानंतर ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी भातकापणीला सुरुवात केली. डहाणू आणि तलासरी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. ज्यावर अनेक कुटुंबे आपला उदरनिर्वाह करीत आहेत. पारंपरिक भातपीक कापल्यानंतर, लगेचच भाजीपाला, कडधान्य, वाल, हरभरा आणि बांधावरील तूर यांसारख्या पिकांची लागवड केली जाते. यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शनही शेतकऱ्यांना मिळत आहे.
भात हे या भागातील मुख्य पीक असल्यामुळे त्याला शेतकऱ्यांकडून मोठे प्राधान्य दिले जाते; मात्र सध्या शेतात काम करणारे मजूर कमी असल्यामुळे आणि मजुरीच्या दरात वाढ झाल्याने अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील सदस्यांच्या मदतीनेच कापणीचे काम करीत आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या परतीच्या पावसाने काही प्रमाणात भातपिकाचे नुकसान झाले आहे; परंतु आता पीक तयार झाल्याने शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत सावधगिरीने कापणीला सुरुवात केली आहे.
ऑक्टोबरचे कडक ऊन असल्याने बळीराजा शेतात घामाघूम होत मेहनत करत आहे. शेतकऱ्यांच्या या श्रमाचा सन्मान करण्याची वेळ आली आहे, कारण त्यांच्या कष्टांमुळेच आपल्या पोटात अन्न आहे. यावर्षी भातपीक चांगले आले असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आह; मात्र पुन्हा परतीचा पाऊस पडू नये, अशी शेतकरी प्रार्थना करीत आहेत. दिवाळीच्या सणाच्या उत्साहामुळे शेतकऱ्यांच्या कामात जोम वाढला आहे.
आदिवासी शेतकऱ्यांचे जीवन
डहाणू तालुक्यातील बहुतांश शेतकरी आदिवासी समाजाचे आहेत आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब भातशेतीवर अवलंबून आहे. भाताचे उत्पादन चांगले आले तर त्याचा काही भाग महामंडळाला विकला जातो. या विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नातून कुटुंबाचे पालनपोषण, तसेच मुलांचे शिक्षण केले जाते. यंदा पीक उत्तम असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत आहे.
मागील वर्षी भातशेतीच्या पिकाचे परतीच्या पावसाने नुकसान झाले होते. यंदा रोगराईही जास्त प्रमाणात झाली नाही आणि कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली नाही. काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने थोडे नुकसान केले असले तरीही चांगले भातपीक आले आहे.
- जयप्रकाश कोदे, शेतकरी
सध्या वातावरण चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांनी भातपिकाच्या कापणीला अनेक ठिकाणी सुरुवात केली आहे. यावर्षी पिके जोमदार आली आहेत आणि सध्या वातावरण चांगले असल्याने कापणीसाठी योग्य वेळ आहे.
- एस. पाचपुते, डहाणू तालुका कृषी अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

