

प्रकाश पाटील : सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. ९ : पालघर विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांसह इच्छुक उमेदवारांची सध्या धावपळ सुरू आहे. शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. इच्छुक उमेदवारही तिकीट मिळण्यासाठी पक्ष कार्यालयात रांगा लावून आहेत. पालघर विधानसभेसाठी चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पालघर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे; मात्र आता दोन गट पडल्याने कार्यकर्त्यांमध्ये फूट पडली आहे. काही जुने कार्यकर्ते उद्धव ठाकरे गटाकडेच आहे. पालघर विधानसभेसाठी महायुतीकडूनही जागा शिवसेनेने मागितली, तर भाजपने माजी खासदार राजेंद्र गावितचे पुनर्वसन करण्यासाठी या जागेची मागणी होत आहे. उद्धव ठाकरे गटाकडून पालघर विधानसभेची जागा लढवली जाणार आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाने या जागेची मागणी केली; मात्र ठाकरे गटही पालघरची जागा लढविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या जागेवर महाविकास आघाडीमधील कोणत्या घटक पक्षाची वर्णी लागते, हे येत्या काही दिवसांत समजणार आहे. बहुजन विकास आघाडीही उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे; मात्र माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी बहुजन विकास आघाडीला रामराम ठोकून नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगण्याची शक्यता आहे.
२०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत पालघर विधानसभेवर शिवसेनेचे श्रीनिवास वनगा निवडून आले होते. या पक्षात दोन गट पडल्यामुळे वनगा हे शिंदे गटाकडे गेले. आता होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिंदे गटातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष वैदेही वाढाण यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी प्रचारालाही जोरदार सुरुवात केली आहे. त्यांचा जनसंपर्कही मोठा आहे. जिल्हा परिषदेवर त्या तीनवेळा निवडून आल्या आहेत.
पालघर विधानसभेची जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. वाढाण या अनुसूचित जमाती तथा आदिवासी समाजाच्या असून स्थानिक उमेदवार आहेत. ही त्यांच्या जमेची बाजू आहे, मात्र नुकताच बहुजन विकास आघाडीमधून माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काहीतरी वेगळे घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपनेही जागा त्यांना मिळावी, म्हणून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी माजी खासदार राजेंद्र गावित हे प्रयत्नात आहेत. त्यामुळे महायुतीमधून कोणत्या पक्षाची वर्णी लागते, हे काही दिवसांत कळणारच आहे.
उद्धव ठाकरे गटामधून इच्छुक उमेदवारांची यादी तयार झाली आहे, मात्र नावे गुलदस्त्यात ठेवलेली आहेत. त्याच्या काही दिवसांत नावे पुढे येतील, असे जिल्हाप्रमुखांकडून सांगितले जाते. बहुजन विकास आघाडीनेही अजून उमेदवार निश्चित केलेला नाही. इच्छुकाचे नावही पुढे आलेले नाही. महाविकास आघाडीकडून ही जागा कोणत्या पक्षाला द्यायची, याचेही वरिष्ठ पातळीवरून अजून निश्चित झालेले नाही, मात्र उद्धव ठाकरे यांनी या जागेची मागणी केली आहे. काँग्रेसने उमेदवारी निश्चित करण्याचे काम सुरू केले. उमेदवारांच्या मुलाखतीही होणार आहेत. एकंदरीत पालघर विधानसभेच्या निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.