

मुरबाड, ता. ९ (बातमीदार) : मुरबाड शहरात मंगळवारी (ता. ८) रात्री दहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला. वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. विजेच्या तारा तुटल्या, विद्युत पोल, नगरपंचायतीच्या पथदिव्यांचे खांब वाकले, तर काही ठिकाणी ते तुटून पडले आहेत. रस्त्यावर झाडे पडल्याने शहरातील अंतर्गत वाहतूक खोळंबली होती, तसेच पावसामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मुरबाड शहराजवळील देवगाव, देवपे परिसरातही अनेक झाडे उन्मळून पडली आहेत.
मुरबाड पोलिस ठाण्याच्या आवारात असलेले पिंपळाचे झाड पोलिस ठाण्यालगत असलेल्या तीन दुकानांवर पडले. त्यामुळे या दुकानांचे नुकसान झाले आहे, तसेच मुरबाड नगरपंचायतीने लावलेल्या पथदिव्यांचा खांबसुद्धा वाकला. मुरबाड शहरातील अनेक घरांची कौले पत्रे उडून लोकांच्या घरात पाणी साचले. काही घरांचे पत्रे उडून दुसऱ्या घरांवर पडले. त्यामुळे घरांचे नुकसान झाले. वारा व पाऊस सुरू होताच मुरबाड शहरातील बत्ती गुल झाली. बुधवारी (ता. ९) दुपारनंतर विद्युतपुरवठा सुरळीत होईल, असे महावितरणच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्याने बुधवारी मुरबाड शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
मुरबाड परिसरातील अनेक गावांनाही या वादळी पावसाचा तडाखा बसला. दरम्यान, मुरबाड तहसीलदार कार्यालयामार्फत शहरातील नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार सुषमा बांगर यांनी दिली. दरम्यान, शेतामध्ये तयार झालेले भातपीक शेतामध्येच आडवे पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तसेच कापणी खर्चात वाढ होणार आहे.
मुरबाड : मुरबाड शहरात अशी अनेक झाडे उन्मळून पडली, तसेच पत्रे उडून गेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.