पालिका शाळेतील सात विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाची लागण?
भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळेतील सात विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाची लागण झाली असल्याचा संशय आहे. त्यांच्या तातडीने अन्य चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यात कुष्ठरोग असल्याची पुष्टी झाल्यास त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून विद्यार्थ्यांची अलिकडेच आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात २०० हून अधिक विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्वरुपाचे आजार असल्याचे निदान झाले आहे.
महापालिकेच्या ३६ शाळांमध्ये सुमारे नऊ हजारांच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील सात हजार ५०० विद्यार्थ्यांची गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातील २१३ विद्यार्थ्यांना वेगवेगळे आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे त्यातील सात विद्यार्थी कुष्ठरोगाचे संशयित रुग्ण आहेत. कुष्ठरोगाची खात्री करण्यासाठी या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यात रोगाची पुष्टी झाली तर तो कोणत्या पातळीवरचा आहे, यावर त्यांच्या पुढील उपचाराची दिशा नक्की करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त चार विद्यार्थ्यांना क्षयरोगाची लागण झाल्याचा संशय आहे. त्यांच्याही विविध चाचण्या करण्यात येत आहेत.
विद्यार्थ्यांवर उपचार
विद्यार्थ्यांमध्ये १७५ जणांच्या शरिरात हिमोग्लोबीनची कमतरता असून त्यांना रक्तक्षय झाला आहे. या विद्यार्थ्यांना लोहाच्या गोळ्या, इंजेक्शन आदी उपचार सुरू करण्यात आल्या आहेत. नऊ विद्यार्थ्यांना दृष्टीदोष, चार जणांना जन्मजात व्यंग, प्रत्येकी एकाला सेरेब्रल पाल्सी आणि लघवीशी संबंधित आजार, तीन विद्यार्थी मूकबधीर, तर चार विद्यार्थिनींना मासिक पाळीशी संबंधित आजार असल्याचे समोर आले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांवर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालय व महापालिकेच्या भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयात आवश्यक ते उपचार सुरू करण्यात येत आहेत. गरज भासल्यास त्यांच्यावर खासगी रुग्णालयातही उपचार केले जातील.
- डॉ. संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

