परतीच्या पावसामुळे भातपिकाचे नुकसान
भाजीपाल्याचे नुकसान; पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
खर्डी, ता. ९ (बातमीदार) : शहापूर तालुक्यात बुधवारी (ता. ९) दुपारी तीनच्या दरम्यान झालेल्या वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे भातपिकाचे नुकसान झाले आहे. भातपीक भिजल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. त्यामुळे सरकारने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी जिजाऊ संस्थेचे खर्डी विभाग अध्यक्ष अशोक विर यांनी केली आहे.
तालुक्यातील खर्डी, अजनुप, कसारा, शहापूर व किन्हवली परिसरातील शेतकऱ्यांना अचानक पाऊस आल्याने शेतात कापून ठेवलेला भात सुरक्षित ठिकाणी नेताना कसरत करावी लागली. काही ठिकाणी भाताच्या लोंब्यांची नासाडी होऊ नये, यासाठी त्यावर प्लॅस्टिक टाकले, तर वीटभट्टीवरील विटांचाही चिखल झाल्याने त्यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी दुपारी परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर्षी भरघोस पीक आल्याने शेतकरी दिवाळी आनंदात जाईल, या आशेवर होते. पावसामुळे मेहनत व पैसा वाया गेल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.
खर्डी-कसारा परिसरातील अजनुप, दहीगाव, कळमगाव, खर्डी, वेळूक-वाशाळा व आटगाव परिसरातील वीटभट्टी व्यावसायिकांच्या कच्च्या विटांवर पाणी पडल्याने त्यांची माती झाली आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे, तसेच येथील भेंडी, उडिद, वाल, हरभरा, तूर यासारख्या पिकांवर रोग पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंबा व मोगरा बागायतदारांचेही नुकसान झाले आहे.
पावसामुळे भातशेती, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने तत्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी. शेतकऱ्यांना दिवाळीत खासगी सावकाराकडून कर्ज घेऊ लागू नये, यासाठी तत्काळ आर्थिक मदत करावी.
- अशोक विर, खर्डी विभाग अध्यक्ष, जिजाऊ सामाजिक संस्था.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

