दिवाळीपूर्वीच बहिणींना भाऊबीज
दीड हजारांचा हप्ता तीन हजार करणार!
लाडकी बहीण योजना सुरूच राहणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माणगाव येथे ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. सध्या दरमहा दिली जाणारी दीड हजारांची रक्कम टप्प्याटप्प्याने तीन हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या योजनेबद्दल अपप्रचार करणाऱ्या सावत्र भावांपासून सावध राहा, असेही आवाहन शिंदे यांनी केले. यावेळी संगणकीय कळ दाबून राज्यातील २.३० कोटी महिलांच्या खात्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे प्रत्येकी तीन हजार, असे एकूण १७ हजार २०० कोटी रुपये वर्ग करण्यात आले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमाचे माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार भरत गोगावले आदी उपस्थित होते. ‘महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी अनेक चांगल्या योजना राबविल्या. त्यातून अनेक महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. आमच्या महिला-भगिनी कष्ट करतात, कुटुंबासाठी राबतात, याची आम्हाला जाणीव आहे. अशा कष्टकरी बहिणींसाठी ही योजना सुरू करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात दोन कोटी २६ लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे’, असे शिंदे यावेळी म्हणाले.
महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांचे कौतुक करून मुख्यमंत्री शिंदे यांनी सचिव अनुपकुमार यांच्या नेतृत्वात ही योजना वेगाने राबविण्यात आल्याचे नमूद केले. तसेच, जास्तीत जास्त महिलांना योजनेत सहभागी करून घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
------
राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम : उपमुख्यमंत्री पवार
राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम असून पुढील काळातही ही योजना अशाच प्रकारे चालू राहील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राज्य सरकार समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. राज्यातील सर्वसामान्य महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. तसेच, महिलांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलिंडर देण्याची योजनाही सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी मोफत वीजबिल योजना आणली. याअंतर्गत राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना १५ हजार कोटींची वीजबिल माफी देण्यात आली.
--------
लाडक्या बहिणींना विविध लाभांचे वाटप
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या सर्व लाभार्थ्यांना एकूण १७ हजार २०० कोटी रुपये वाटप करण्यात आले. त्याचा धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात १० महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच, पिंक ई-रिक्षा, लेक लाडकी योजना, मोफत गॅस सिलिंडर यासह अन्य योजनेच्या महिला लाभार्थ्यांनाही धनादेश व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
------
भाजप कार्यकर्त्यांचा बहिष्कार
रायगड जिल्ह्यात जागावाटपावरून निर्माण झालेल्या महायुतीत राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. अलिबाग-मुरूड आणि कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू केली आहे. यास शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांनी तीव्र विरोध आहे, याचे पडसाद आज माणगाव येथील कार्यक्रमात उमटून आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी माणगाव येथील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या व्यतिरिक्त भाजपचाही मोठा नेता कार्यक्रमस्थळी फिरकला नाही. त्यामुळे स्थानिक कार्यकर्तेही कार्यक्रमास अनुपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी व्हिडिओ क्लीपद्वारे रायगडमधील लाडक्या बहिणींना शुभेच्छा दिल्या.
------
बहिणींची बस मांजरोणे घाटात कोसळली
या कार्यक्रमासाठी माणगाव तालुक्यातील मौजे रानवडे येथील महिलांना घेऊन येणारी बस दुपारी साडेबाराच्या सुमारास मांजरोणे घाटात सुमारे ४० फूट खाली कोसळली. त्यात दोन महिला जखमी झाल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ब्रेक निकामी झाल्याने बसला अपघात झाल्याचे सांगण्यात आले. जखमी महिलांवर योग्य उपचार करून त्यांना सुखरूप घरी पोहोचवावे, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

