

रस्ते, चौकांनी घेतला मोकळा श्वास
आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर १४ हजार ५७८ बॅनर, पोस्टर, झेंडे हटवले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : राज्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आदर्श आचारसंहितादेखील लागू केली आहे. आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील सहा महापालिका, नगरपरिषद आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध चौकात, खासगी जागेवर, शासकीय जागांवर लावण्यात येणारे राजकीय बॅनर, पोस्टर आणि झेंडे हटविण्याची कारवाई सुरू केली. त्यानुसार ७२ तासांत जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रातील तब्बल १४ हजार ५७८ बॅनर, पोस्टर, कटआऊट, भिंतीपत्रक आणि झेंडे हटविले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील बॅनर, पोस्टरने गुदमरलेल्या चौक, नाक्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या राजकीय पुढाऱ्यांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींनी चौकाचौकांत राजकीय पक्षांच्या नेत्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देणारे फलक लावले होते, तसेच पक्षात मोठे पद मिळालेल्या नेत्यांना शुभेच्छा देणारे फलक लावले होते. हे फलक लावल्यानंतर ते काढण्याची तसदी मात्र त्यांच्याकडून घेण्यात येत नसल्याचेदेखील दिसून येत असते. यामुळे बरेच दिवस हे फलक त्याच जागेवर दिसून येतात. या फलकांमुळे शहरातील चौक व नाके यांचे विद्रुपीकरण होते. अशा बेकायदा फलकांवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून फारशी कारवाई होत नसल्याची ओरड सातत्याने होत असते. त्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून शहरात राजकीय बॅनरबाजीचे प्रमाण वाढले होते. शहरातील नाक्यानाक्यांवर आणि चौकाचौकात राजकीय पक्षांच्या नेत्यांचे फलक झळकताना दिसून येत होते, तर कुठे केलेल्या कामाचे श्रेय घेणारे फलकदेखील लावण्यात आले होते. यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाल्याचे चित्र होते. दरम्यान, मंगळवारी दुपारनंतर विघानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघात लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे बॅनर, झेंडे, पोस्टर, कटआऊट उतरविण्यास सुरुवात केली.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील बेकायदापणे लावलेले राजकीय बॅनर, पोस्टर, भिंतीपत्रके, झेंडे काढून टाकण्याची कारवाई करण्यास सुरुवात केली. त्यानुसार मागील ७२ तासांत प्रशासनाने शासकीय, सार्वजनिक व खासगी मालमत्तांवरील सहा हजार ५६१ बॅनर, तीन हजार १५६ पोस्टर, दोन हजार ५३४ झेंडे, एक हजार भिंती पत्रके आणि एक हजार ३२३ कटआऊट हटविले आहेत.
कारवाईची आकडेवारी (१८ विधानसभा मतदारसंघांतील)
भिंतीपत्रक - १००४
पोस्टर्स - ३१५६
कटआऊट - १३२३
बॅनर - ६५६१
झेंडे - २५३४
एकूण - १४५७८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.