

रेल्वेचे आरक्षण आता ६० दिवस आधी
नियमात बदल; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : भारतीय रेल्वेने तिकिटांचे आगाऊ आरक्षण करण्याच्या कालावधीत मोठा बदल केला आहे. तो कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणला आहे. या नियमाची अंमलबजावणी १ नोव्हेंबर २०२४ पासून होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन अधिक सुलभ होणार असून तिकीट रद्द होण्याची समस्या कमी होईल. भारतीय रेल्वेच्या या निर्णयाचे प्रवासी संघटनांकडून स्वागत करण्यात येत आहे.
भारतीय रेल्वेने आगाऊ तिकीट आरक्षणाचे नियम बदलले आहेत. पूर्वी तिकीट बुकिंग प्रवासाच्या १२० दिवस (चार महिने) आधी सुरू होत असे, आता ते ६० दिवसांवर आणले आहे. नवीन निर्णय १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू होणार आहे. ३१ ऑक्टोबर, २०२४पर्यंत पुढील १२० दिवसांसाठी आरक्षित केलेल्या तिकिटांवर कोणताही परिणाम होणार नाही. १ नोव्हेंबरपासून ६० दिवसांच्या पुढील दिवसांचे आरक्षण थांबवले जाऊन नवीन कालावधीनुसार सुरू होईल. तसेच, विदेशी पर्यटकांसाठी ३६५ दिवसांच्या मुदतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तिकीट आरक्षणासाठी कमी कालावधी ठरवल्यामुळे तत्काळ प्रवासाचे नियोजन करणे सोपे होईल. तसेच, गाडी रद्द झाल्यास प्रवाशांना समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत भारतीय रेल्वेने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरून प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा केली आहे. याअंतर्गत तिकीट आरक्षणानंतर त्वरित सीट उपलब्धता तपासण्यासाठी एआय मॉडेल तयार करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना प्रतीक्षा यादीतून लवकर तिकीट मिळण्यास मदत होईल आणि ३० टक्के अधिक प्रवाशांना निश्चित तिकीट मिळण्याचे प्रमाण वाढले आहे.
...
दररोज १२.३८ लाख तिकिटांचे आरक्षण
सध्या आयआरसीटीसी संकेतस्थळ, ॲप आणि रेल्वे बुकिंग काउंटरद्वारे तिकीट बुकिंग केले जाते. दररोज १२.३८ लाख तिकिटे आयआरसीटीसीद्वारे बुक केली जातात. आरक्षण कालावधी ६० दिवसांचा होता. तेव्हा सरकारने असा युक्तिवाद केला होता की, बुकिंग कालावधी १२० दिवसांपर्यंत वाढवल्याने दलाल निराश होतील. कारण त्यांना जास्त रद्दीकरण शुल्क द्यावे लागेल. तथापि, त्यानंतर अनेकांनी असा युक्तिवाद केला की, आरक्षणाचा कालावधी वाढवण्याचा रेल्वेचा उद्देश अतिरिक्त ६० दिवसांच्या व्याजासह जास्त संख्येने तिकिटे रद्द करून अतिरिक्त महसूल मिळवण्याचा होता. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून आगाऊ तिकीट आरक्षणाचा कालावधी कमी करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात होती. त्यानंतर आता भारतीय रेल्वेने निर्णय घेतला आहे.
...
कालावधी बदलाचे फायदे
- सध्या, जवळपास २१ टक्के रद्दीकरण आता चार ते पाच टक्क्यांपर्यंत येईल
- दलाल व रेल्वे कर्मचाऱ्यांकडून बेकायदा पैसे घेणे थांबेल
- कमी कालावधीमुळे अधिक तिकीट काढण्यास प्रोत्साहन मिळेल
- कमी कालावधीमुळे विशेष गाड्यांची आगाऊ योजना होऊ शकते
...
प्रवासी संघटना गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे गाड्यांचे आगाऊ आरक्षणाचा कालावधी कमी करण्याची मागणी करत होत्या. त्यानुसार रेल्वेने आरक्षण नियमात बदल केला आहे. यामुळे रेल्वे तिकिटांचे रद्दीकरण आणि काळाबाजार थांबेल.
- सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल यात्री परिषद
...
चार महिन्यांपासून प्रवासाचे नियोजन कोणीही प्रवासी करत नाही. आगाऊ आरक्षणाचा कालावधी ६० दिवस कमी केल्याचे स्वागत करतो; परंतु आता तरी प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळण्यासाठी रेल्वेने प्रयत्न करावेत.
- लता अरगडे, अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.