उमेदवार आईचे नाव लावणार का?

उमेदवार आईचे नाव लावणार का?
Published on

उमेदवार आईचे नाव लावणार का?
विधानसभा निवडणुकीतही अंमलबजावणीकडे दुर्लक्ष
संजीव भागवत
मुंबई, ता. २२ ः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने जन्मदात्या आईचे नाव प्रत्येक नावासोबत लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला, मात्र राज्यात आता विधानसभा‍ निवडणुका येऊन ठेपल्या असतानाही त्याची नीट अंमलबजावणी होऊ शकली नाही. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवारांच्या नावापुढे आईचे नाव लावण्याची अंमलबजावणी केली जाईल का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
राज्यात १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजांमध्ये त्यांचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव या क्रमाने करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर त्यासाठीचा धोरणात्मक निर्णयही जारी करण्यात आला आहे, मात्र राज्यात मागील काही महिन्यांत लाडक्या बहिणीचा गाजावाजा करण्यात आईच्या नावाचाच सरकारला विसर पडला होता. त्‍यामुळे शासकीय कामकाजात आईच्या नावाची अजूनही प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकली नाही.
काही अपवाद वगळता राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांमध्येही आपल्या नावापुढे आईचे नाव जोडून घेण्याचा विसर पडला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजातही आईचे नाव लावण्यात आले नव्हते. त्‍यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवारांच्या नावापुढे आईचे नाव जोडण्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी स्त्रीवादी संघटना, महिला साहि‍त्यिक, विविध संघटनांच्या प्रतिनिधींकडून केली जात आहे.

मंत्रालयात, विधान भवनातही निराशा
आपल्या नावापुढे आईचे नाव लावण्यासाठी मंत्रालयात काही मंत्र्यांनी आपल्या नावाच्या पाट्या लावून त्याला पाठिंबा दर्शवला, तर काहींनी त्याकडे डोळेझाक केली. अजूनही आपल्या नावाच्या पाट्यांमध्ये बदल करून घेण्यात अधिकाऱ्यांकडून दिरंगाई होताना दिसते.
-
इथे जोडले जाणार आईचे नाव
१ मे २०२४ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव, आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपातच करणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशीच नोंद सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवापुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने आदी शासकीय दस्तऐवजामध्येही करावी लागणार आहे.

कोट
लाडक्या बहिणीचे सरकारकडून खूप कौतुक करण्यात आले, परंतु मातृशक्तीचा जागर करण्यासाठी आपणच नावापुढे आईचे नाव लावण्याच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केले. त्‍यामुळे बहुसंख्य ठिकाणी आईचे नाव लावलेले दिसत नाही. यामुळे या विधानसभा निवडणुकीत आईचे नाव लावण्यासाठी अंमलबजावणी झाल्यास एक मोठा पायंडा सुरू होईल.
- वर्षा विद्या विलास
सरचिटणीस, नशाबंदी मंडळ, मुंबई

आईचे नाव लावण्यासाठी कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. हा निर्णय खूप अगोदर व्हायला हवा होता. आईच्या नावाच्या अंमलबजावणीसाठी खरं तर एक दबाव निर्माण होण्याची गरज आहे.
- डॉ. संजय मंगला गोपाळ,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, ठाणे


राज्यात आतापर्यंत मुलगा किंवा मुलीला आपल्या नावापुढे केवळ वडिलांच्या नावाचा उल्लेख  बंधनकारक होता; पण जन्मदात्या आईच्या नावाचा उल्लेख करणे सक्तीचे नव्हते. मातृशक्तीचा सन्मान व्हावा, यासाठी मुलांच्या नावापुढे आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारने मार्च महिन्यात घेतला होता. त्याची अंमलबजावणी होणे आश्यक आहे.
- बाईजाबाई घोडे
सामाजिक कार्यकर्त्या, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com