पंधरा लाखांच्या चोरीप्रकरणी नोकराला अटक

पंधरा लाखांच्या चोरीप्रकरणी नोकराला अटक
Published on

पंधरा लाखांच्या चोरीप्रकरणी नोकराला अटक
मालाड पोलिसांची कारवाई
अंधेरी, ता. २२ (बातमीदार) ः मालाडला राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या घरातील सुमारे पंधरा लाखांचा मुद्देमाल चोरी करून पळून गेलेल्या नोकराला मालाड पोलिसांनी अटक केली. नितीशकुमार रामआशिष साह असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याच्याकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार आहे.
तक्रारदार व्यावसायिक असून ते आई-वडिलांसोबत मालाड परिसरात राहतात. गेल्यावर्षी जुलै महिन्यात नितीशकुमार हा त्यांच्या घरी घरगडी म्हणून कामाला लागला होता. चार महिने काम केल्यानंतर त्याने नोकरी सोडून दिली होती. त्यानंतर जून २०२४ रोजी तो पुन्हा नोकरीसाठी त्यांच्याकडे आला होता. दिवसभर काम करून नितीशकुमार हा किचनमध्येच झोपत होता. दोन महिने काम केल्यानंतर नितीशकुमार ३० जुलैला पुन्हा नोकरी सोडून गेला होता. या वेळी त्याने तक्रारदार व्यावसायिकाला काहीच सांगितले नव्हते. घरातून तो कोणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. त्यामुळे त्यांनी त्याला दोन दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. ४ ऑक्टोबरला त्यांनी त्यांच्या कपाटातील लॉकरची पाहणी केली होती. या वेळी त्यांना सुमारे पंधरा लाखांचे लॉकरमधून सोने, चांदी आणि हिरेजडीत दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. नितीशकुमारनेच ही चोरी करून घरातून पलायन केले होते. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार मालाड पोलिसांना सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. पोलिसांनी नितीशकुमारविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली होती. तो त्याच्या बिहार येथील गावी पळून गेल्याची शक्यता असल्याने तिथे एक टीम पाठविण्यात आली होती. अखेर पळून गेलेल्या नितीशकुमारला तीन दिवसांपूर्वी मालाड पोलिसांनी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com