गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले ४७ जण हद्दपार
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले ४७ जण हद्दपार
मुलुंड पोलिस परिमंडळाची कारवाई
घाटकोपर, ता. १७ (बातमीदार) : सध्या राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून, गेल्या १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिताही लागू झाली आहे. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या पूर्व प्रादेशिक विभागातील परिमंडळ सातच्या अखत्यारितील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल ४७ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त परिमंडळ सातअंतर्गत मुलुंड, नवघर, भांडुप, कांजूरमार्ग, पार्क साईट, घाटकोपर, पंतनगर पोलिस ही पोलिस ठाणी आहेत. त्यांच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे, तसेच वारंवार गुन्हे करून सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात आणणारे गुन्हेगार यासह बेकायदेशीर धंदे आणि कृत्य करणारे गुन्हेगार, तसेच सराईत गुन्हेगार यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने ४७ सराईत गुन्हेगारांना पोलिस उपआयुक्त विजयकांत सागर यांनी आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत हद्दपार केले आहे. विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी त्यांच्या पोलिस ठाणे अभिलेखावरील आरोपींचा हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५ अन्वये ही कारवाई केल्याचे सांगितले.
सात पोलिस ठाण्यांतील कारवाई
परिमंडळ सातअंतर्गत येणाऱ्या पोलिस ठाणे हद्दीतील ४७ सराईत गुन्हेगारांना बृहन्मुंबई, ठाणे व नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीबाहेर हद्दपार केले आहे. ही कामगिरी मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलिस आयुक्त, देवेन भारती, पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ सातचे पोलिस उपआयुक्त विजयकांत सागर यांनी केली आहे. दरम्यान, आगामी काळातही सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे, वारंवार गुन्हे करून सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात आणणारे गुन्हेगार, तसेच अवैध धंदे व बेकायदेशीर कृत्य करणारे सराईत गुन्हेगार यांच्याविरुद्ध अशा प्रकारची कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

