फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक
जव्हार, ता. १७ (बातमीदार) : तालुकाभरातील नागरिक जव्हार शहरात विविध कामांकरिता दाखल होत असतात. अनेकदा शासकीय कामे होताना वेळ लागतो. त्यामुळे भूक भागविण्यासाठी अनेक नागरिक फास्ट अथवा जंक फूड खाण्याला पसंती देतात, मात्र याच पदार्थांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आंत्रपुच्छ (अपेंडिक्स)सारख्या आजाराचा धोका अधिक वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
गेल्या काही वर्षांत आंत्रपुच्छच्या रुग्णांत वाढ झाली आहे. सततची धावपळ, जेवणाच्या वेळा न पाळणे, फास्ट फूडचे सेवन, रात्रीचे जागरण यामुळे या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या १० महिन्यांपासून या आजाराच्या रुग्णांवर शस्त्रक्रियांचे प्रमाणही वाढले आहे. अलीकडे लहान मुलांपासून वृद्ध माणसेदेखील फास्ट फूडचा ट्रेंड स्वीकारत झमझमीत नाष्ट्याचा आस्वाद घ्यायला लागली आहेत. याचा परिणाम थेट त्यांच्या आरोग्यावर होताना दिसून येत आहे. यातून त्यांना अपेंडिक्ससारख्या आजाराचा सामना करावा लागत आहे. हा त्रास सुरू झाला की, शस्त्रक्रियेशिवाय पर्याय उरत नाही.
अलीकडे प्रत्येक नागरिकाच्या हाती मोबाईल आला आहे. रात्रीच्यावेळी स्मार्टफोन पाहत पाहत झोपण्यासाठी उशीर होतो. या जागरणामुळे शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळेही अपेंडिक्सचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. या आजारांपासून दूर राहायचे असेल तर रात्रीची जागरणे टाळायला हवीत. अशा प्रकारचा त्रास जाणवायला लागला, तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेणे महत्त्वाचे ठरते. लहान मुले, तसेच तरुणांना अपेंडिक्सचा धोका अधिक असतो. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते.
लक्षणे काय?
ओटीपोटात दुखणे, मळमळ, ताप आणि उलट्या ही अपेंडिक्सची काही प्रमुख लक्षणे आहेत. याकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते.
सूज येण्याची कारणे?
अपेंडिक्सवर सूज येण्याची दोन कारणे आहेत. एक इन्फेक्शन आणि दुसरे अपेंडिक्समध्ये काही फसल्यानेही सूज येते. सतत तळलेले आणि तिखट पदार्थ खाल्ल्याने पोटाचे विकार जडू शकतात. त्यामुळे तिखट, तळलेले पदार्थ खाणे टाळावे.
काय आहे आजार?
अपेंडिक्स हा एक लहान बोटांसारखा अवयव आहे. तो पोटाच्या खालच्या उजव्या लहान व मोठ्या आतड्याच्या मधोमध नळीच्या आकाराच्या थैलीसारखा दिसतो. आपल्या पोटात लहान आतडे संपून मोठ्या आतड्याची सुरुवात होते, तिथे सुरुवातीला मोठ्या आतड्याचा भाग एखाद्या फुगीर पिशवीसारखा असतो. या पिशवीपासून शेपटीसारखे हे आंत्रपुच्छ निघते. ते आतून पोकळ असते आणि त्याचे दुसरे पलीकडचे टोक बंद असते. याच्या या प्रकारच्या ठेवणीतच दुखण्याचे कारण लपलेले आहे.
अपेंडिक्सच्या आजारापासून दूर राहायचे असेल, तर जेवणातील अनियमितता आणि अति जागरण नको. जंक फूड, अति मांसाहार या आजाराला कारणीभूत ठरतो. नियमित व वेळेत जेवण, शाकाहारी जेवण आणि पुरेशी झोप या त्रिसूत्रीचा अवलंब प्रत्येकाने करावा, जेणेकरून अपेंडिक्सच्या आजारापासून दूर राहता येईल.
- डॉ. रामदास मराड, जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

