मतदारसंघातील प्रभागांवर ड्रोनची करडी नजर
मतदारसंघातील प्रभागांवर ड्रोनची करडी नजर
खडकपाडा पोलिसांकडून ड्रोनचे प्रात्यक्षिक
कल्याण, ता. १७ (वार्ताहर) : एकीकडे विधानसभा निवडणुकीचा राजकीय प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासह आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यासाठी ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने अत्याधुनिक अशा ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली जात आहे. कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा पोलिसांनी आपल्या हद्दीतील विविध भागांत या ड्रोनची तपासणी केली.
बुधवारी (ता. २०) मतदान होणार असून त्याला आता अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. मतदारसंघातील प्रचाराचा धुरळा आता शिगेला पोहोचला असून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाची ही सर्व प्रक्रिया आणि आचारसंहिता निर्धोकपणे पार पडण्यासाठी पोलिस प्रशासनही सज्ज झाले आहे. राजकीय प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच राजकीय पक्षांकडून आचारसंहितेचा भंग होऊ नये, याची विशेष दक्षता पोलिस प्रशासन घेत आहे. त्याअंतर्गत विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांचा रूट मार्च काढण्यात येत आहे. त्याबरोबर आता ड्रोन कॅमेऱ्यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचीही गस्त घालण्यासाठी मदत घेतली जात आहे.
खडकपाडा पोलिसांनी आपल्या हद्दीवर देखरेख ठेवण्यासाठी पाच ड्रोन कॅमेरे तैनात ठेवल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे यांनी दिली, तसेच खडकपाडा येथील साई चौक, कैलाश पार्क, साई संकुलासह योगीधाम परिसरात गर्दीच्या ठिकाणचे पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रविवारी या ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्याचे त्यांनी सांगितले.
राखीव पोलिस दलाची तुकडी तैनात
मतदारसंघांत कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी एकीकडे स्थानिक पोलिसांच्या जोडीला केंद्रीय राखीव पोलिस दलाची तुकडीही कल्याण परिमंडळात तैनात केली आहे. त्यासोबतच आता पोलिस प्रशासन ड्रोन कॅमेऱ्याच्या तिसऱ्या डोळ्याचीही मदत घेत आहे. कोणतीही अपप्रवृत्ती किंवा नकारात्मक घडामोड आता पोलिसांच्या नजरेतून सुटणार नाही, असा विश्वास पोलिस प्रशासन व्यक्त करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

