शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी स्मृती स्थळावर सर्वपक्षीय नेत्यांची गर्दी
शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावर गर्दी
अभिवादनासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह शिवसैनिकांची रांग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असून उमेदवारांसह सर्वच नेते प्रचारात व्यग्र आहेत. तरीही आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांबरोबरच निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवार आणि इतर पक्षांच्या नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळावर हजेरी लावली होती. यावेळी भाजप आणि मनसेच्या नेत्यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वसामान्य शिवसैनिकांसह राजकीय नेत्यांनी सकाळपासून रांग लावली. स्मृतिस्थळ परिसरात सजावट आणि चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी सकाळीच शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केले. तसेच, शिवसेना नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई, अजय चौधरी, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, साईनाथ दुर्गे, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, दगडू सकपाळ, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, महेश सावंत यांनीही अभिवादन केले.
सध्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार चिखलफेक सुरू आहे. भाजपकडून सातत्याने उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले जात असून तेही सडेतोड उत्तर देत आहेत. तरीही आज भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा, निरंजन डावखरे, मनसेचे बाळा नांदगावकर यांनी स्मृतिस्थळावर हजेरी लावत अभिवादन केले. याशिवाय धारावी विधानसभेतील काँग्रेसच्या उमेदवार डाॅ. ज्योती गायकवाड यांनी स्मृतिस्थळावर हजेरी लावली होती. शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर लहान शाळकरी मुले आणि दिव्यांग मुलांनीही हजेरी लावली होती. त्यांची शिस्त पाहून सर्वच जण अचंबित झाले होते.
...
बाळासाहेब आमच्या हृदयात!
‘बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेचे काम सुरू केले. ते वर्षाचे ३५६ दिवस आमच्या हृदयात असून त्यांचे विचार कायम जपले आणि जपत राहणार,’ असे मत माहीम विधानसभेतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुखांना अभिवादन केल्यावर आपण विजयी होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला.
...
अल्पोपाहाराची सोय
शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या शिवसैनिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या अंगीकृत संघटनांच्या वतीने बाटलीबंद पाणी आणि अल्पोपाहाराची सोय करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

