विधानसभा निवडणूक प्रचाराचा धुरळा
विधानसभा निवडणूक प्रचाराचा धुरळा
उमेदवारांनी काढल्या दुचाकी रॅली; फ्लॅश मॉब, पथनाट्यांचाही थरार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज (ता. १७) शेवटचा रविवार असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सकाळपासूनच प्रचाराला सुरुवात केली. दिवसभरात बहुतांश मतदारसंघ पालथा घालायचा प्रयत्न केला. कुणी चौकसभा, पदयात्रा, तर कुणी सोसायट्यांमध्ये जाऊन मतदारांची भेट घेतली. बहुतांश उमेदवारांनी दुचाकी रॅलीवर भर दिला. काहींनी राहून गेलेल्या ठिकाणी धावती भेट घेत आपले टार्गेट पूर्ण केले.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातील प्रचार संपवून महाविकास आघाडीच्या सभेला कार्यकर्त्यांसह हजेरी लावली. वरळी मतदारसंघात माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांच्यात मुख्य लढत आहे. मनसेच्या संदीप देशपांडे यांच्यामुळे येथे तिरंगी लढत बघायला मिळत आहे. सकाळी तिन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून रॅली काढत प्रचार करण्यात आला. उन्हाचा तडाखा वाढण्याच्या आत बहुतांश परिसरातील प्रचार उरकण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरेंनी धावता प्रचार करत घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर ते आपल्या इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी देवगडला गेले. त्यांच्या प्रचाराची कमान नंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी आमदार सुनील शिंदे यांनी सांभाळली. त्यांनी सोसायट्यांचे पदाधिकारी, सामाजिक मंडळे आणि महिला मंडळांच्या भेटी घेतल्या.
वांद्र्यात रोड शो, दुचाकी रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. मातोश्रीचे अंगण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काट्याची टक्कर आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही प्रमुख उमेदवारांनी प्रचाराची राळ उठवून दिल्याचे दिसले. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वरूण सरदेसाई यांनी सकाळी शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुखांसमोर नतमस्तक होत आपल्या प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर सकाळी वांद्रे पूर्व परिसरात भेटीगाठी आणि रोड शो केला, तसेच दुपारी दुचाकी रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सायंकाळीही रोड शोचे आयोजन केले होते. महायुतीचे उमेदवार झिशान सिद्दीकी यांनीही सकाळपासूनच वांद्रे पूर्वेकडील झोपडपट्टी परिसरात घरोघरी जात मतदारांशी संवाद साधला, तसेच रोड शोच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती केली. सायंकाळी रोड शो करत मतदारांशी संवाद साधला.
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात प्रचार जोरात सुरू होता. महायुतीच्या उमेदवार शायना एनसी यांनी मोठ्या प्रमाणावर रोड शो केला. स्थानिकांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. औंक्षण करत महिलांनी त्यांचे स्वागत केले. पारंपरिक वाद्ये वाजवून आशीर्वाद दिला. त्यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या.
मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात सकाळी घरोघरी प्रचार, दुपारी सायंकाळी रॅली काढण्यात आली. समाजवादी पक्षाकडून अबू आझमी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नवाब मलिक, तर शिवसेना ठाकरे गटाकडून सुरेश (बुलेट) पाटील, हे निवडणूक लढवत आहेत.
जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील तीनही उमेदवारांनी रविवारच्या सुटीची संधी साधून मतदारांच्या घरोघरी भेटी, वाडी-वस्ती पिंजून काढण्यावर भर दिला. आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्याचे, तसेच केलेल्या विकासकामांची पत्रके सकाळीच घरोघरी वाटली, तसेच अपक्षांनी रिक्षाच्या पाठीमागे प्रचार पत्रके लावून प्रचार केला.
माहीम मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी शिवाजी पार्क परिसरात प्रचार फेरी काढली. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर दुचाकी रॅली काढली. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर आणि मनसेचे अमित ठाकरे यांनीही प्रचार फेरी काढत मतदारांना मतदानासाठी आवाहन केले. त्यानंतर सरवणकर यांनी काही सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या.
चेंबूर मतदारसंघातील उमेदवारांनी झोपडपट्टीतील मतदारांवर लक्ष केंद्रित केले असून प्रत्येक घरापर्यंत ते पाेहोचत आहेत. अणुशक्तीनगर मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या (अजित पवार) उमेदवार सना मलिक, वंचित पक्षाचे सतीश राजगुरू, चेंबूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार तुकाराम काते, ठाकरे गटाचे प्रकाश फातरपेकर यांनी जोरदार प्रचार केला. चौकसभा, पत्रक वाटप, भित्तीपत्रके लावणे, सकाळी उद्यानात ज्येष्ठ नागरिक, महिला, क्रीडाप्रेमींची भेट, ओपन जिम येथे जात मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. चौक सभा, स्टेज सभा, रोड शो, रॅली, प्रचारात गर्दी दिसावी यासाठी रिक्षाचालक, दुचाकीस्वारांना सहभागी करून घेतल्याने प्रचाराला रंगत आली होती.
घाटकोपर येथील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय भालेराव यांनी दुचाकी रॅली काढून जोरदार प्रचार केला. युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील यांनीही रॅलीत सहभाग घेतला. कांजूरमार्ग पूर्व, पश्चिम, तसेच विक्रोळी भागात दुचाकी रॅली काढली. चेंबूरचे मनसेचे उमेदवार माऊली थोरवे यांच्या प्रचारासाठी दुचाकी रॅली काढण्यात आली होती. या वेळी सर्व उपविभाग अध्यक्ष, शाखाअध्यक्ष, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष सहभागी झाले होते.
विक्रोळीतील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार सुनील राऊत यांच्या प्रचारार्थ संपूर्ण मतदारसंघात प्रचार फेरी काढण्यात आली होती. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या फेरीत सुमारे एक हजार दुचाकी, ३०० कार आणि ६०० रिक्षांच्या ताफ्यासह शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. कन्नमवार नगर, टागोर नगर, कांजूर मार्ग, भांडुप पूर्व या मार्गाने संपूर्ण मतदारसंघात संध्याकाळी पाचपर्यंत या फेरीद्वारे प्रचार करण्यात आला, तर मनसेचे उमेदवार विश्वजीत ढोलम यांनी रहिवाशांच्या सहकारी संस्था, सार्वजनिक उत्सव, क्रीडा मंडळांच्या भेटी घेत प्रचार केला. मुलुंडचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारार्थ दुचाकी रॅली काढण्यात आली. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या रॅलीत सुमारे ४०० दुचाकी आणि २०० कार सहभागी झाल्या होत्या.
भांडुपमधील लक्षवेधी प्रचार
भांडुपमध्ये फ्लॅश मॉब, पथनाट्यांचा थरार दिसला. भांडुप पश्चिम मतदारसंघात इतक्या वर्षांत पहिल्यांदाच निवडणूक प्रचारात फ्लॅश मॉबचा वापर करण्यात आला. येथील मनसेचे उमेदवार शिरीष सावंत यांनी पदयात्रा, प्रचार फेऱ्या, चौक सभा, जाहीर सभा, समाजमाध्यमांद्वारे घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न केला. फ्लॅश मॉबद्वारे त्यांनी मतदारांचे विशेषतः तरुणांचे लक्ष आकर्षित करून घेतले. त्यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांनी खास पथनाट्य बसवले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कोरगावकर, महायुतीचे उमेदवार अशोक पाटील यांनीही पदयात्रा, बैठका घेत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

