निवडणुकीत जातपात कशाला ?

निवडणुकीत जातपात कशाला ?

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : ज्या उपाहारगृहात खाद्यपदार्थांची चव चांगली वाटते तेथे आपण जातो, तसेच वैद्यकीय उपचार घेताना चांगल्या डॉक्टरकडे जातो, मग निवडणुकीत जातीचा विचार का करता, असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मतदारांना केला. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी ४०० पार झाल्यास संविधान बदलणार असल्याचे पसरवले जात होते, मात्र संविधान कोणालाही बदलू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीचे उमेदवार संजय केळकर, प्रताप सरनाईक यांच्यासाठी ठाण्यातील गावदेवी मैदान येथे सभा घेण्यात आली. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील रस्त्यांच्या जाळ्यांची माहिती दिली. रस्ते जोडणीमुळे देशाच्या विकासाला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीयवाद आणि सांप्रदायिकतेचे विष पेरण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार असा अपप्रचार करण्यात आला, पण संविधान बदलण्याची कोणाच्यातही हिंमत नसल्याचे गडकरी म्हणाले. ठाणे, मुंबईसारख्या शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी अनेक उड्डाणपूल उभारले, मात्र तरीही परिस्थितीत जैसे थे असल्याचे त्यांनी मान्य केले. घोडबंदरवरून होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठीचा प्रकल्प पुढच्या वर्षीच्या मार्चपर्यंत पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
...................................
इमानदार नेत्यांची गरज आहे
देशात काम करण्याची इच्छा असल्यामुळे काँग्रेसला ६० वर्षांत करता आले नाही, ते भाजप सरकारने गेल्या १० वर्षांत केले आहे. देश बदलत आहे, त्याचे श्रेय जनतेला जाते. तुम्ही आम्हाला निवडून दिले, त्यामुळे आम्हाला करणे शक्य झाल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. देशात प्रकल्पांच्या कामासाठी पैशांची कमी नसून इमानदार नेत्यांची फक्त गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही महाराष्ट्रात आली पाहिजे, शिवशाही म्हणजे आदर्श राज्य निर्माण करण्याची संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचीसुद्धा तीच इच्छा असल्याचे ते म्हणाले.
...........................
काँग्रेसकडून संविधानाची ऐशीतैशी
आणीबाणीच्या काळात काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची दुरुस्ती केली, परंतु आमचे सरकार येताच त्या दुरुस्त्यांमध्ये बदल केला. ज्या काँग्रेसने संविधानाची ऐशीतैशी केली. तीच काँग्रेस आता संविधान बचावासाठी गावभर फिरत आहे. चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे गेल्या ६० वर्षांमध्ये देशाचा अपेक्षित विकास झाला नाही. आपला देश श्रीमंत आहे, पण जनता गरीब आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com