लोखंडी भांड्यांना वाढती मागणी

लोखंडी भांड्यांना वाढती मागणी

Published on

लोखंडी भांड्यांना वाढती मागणी
माणगाव बाजारपेठेत राजस्‍थान येथून विक्रेते दाखल
माणगाव, ता. १९ (बातमीदार) ः सध्या आरोग्याबाबत प्रत्‍येक जण जागरूक झाला आहे. प्‍लॅस्‍टिक, नॉनस्‍टिकची भांडी आरोग्याला घातक असल्याने लोखंडी भांड्यांना मागणी वाढली आहे. लोखंडी भांड्यातून लोहाचे प्रमाण शरीराला मुबलक प्रमाणात मिळते. त्‍यामुळे लोखंडी भांड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. तालुक्‍यातील बाजारपेठेत राजस्‍थान चित्तोडगड येथून व्‍यापाऱ्यांनी लोखंडी भांडी विक्रीसाठी आणली आहेत. त्‍याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
माणगाव शहर हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून तालुक्याचे शहर म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दररोज असंख्य पर्यटक व अन्य जिल्ह्यातील नागरिक कामानिमित्त माणगाव शहरात येत असतात. तर अनेकजण उदरनिर्वाहासाठी तर कोणी व्यवसायासाठी तालुक्‍यात दोन-तीन महिन्यांच्‍या मुक्‍कामासाठी येतात. सध्या राजस्थान चित्तोडगड येथून अनेक व्‍यापाऱ्यांनी माणगावमधील मोरबा रोडवर रस्त्याच्या दुतर्फा आपले बस्‍तान मांडले आहे. त्‍यांच्‍याकडून लोखंडी तवा, कढई, काविलते, पळी, खलबत्ता, अशा अनेक प्रकारच्‍या भांड्यांची विक्री करण्यात येत आहे. सध्या आरोग्याबाबत जागरूकता वाढली आहे. कोणती भांडी आरोग्यासाठी चांगली असतात, तर कोणती नसतात याची माहिती आता सोशल माध्यमांवरून घराघरात पोहोचली आहे. त्‍यामुळे अनेकांनी प्‍लॅस्‍टिकच्‍या भांड्यांएवजी मातीसह धातूच्‍या भांड्यांना पसंती दिली आहे. त्‍यामुळे बाजारात लोखंडी भांड्यांची विक्री जोरात होत आहे. पूर्वी प्‍लॅस्‍टिकच्‍या भांड्यांना पसंती दिली जात होती, मात्र प्‍लॅस्‍टिक आरोग्यासाठी घातक असल्याने त्‍याचा वापर आता कमी होऊ लागला आहे. तर नॉनस्‍टिकदेखील आरोग्यासाठी चांगले नसल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र लोखंडी भांड्यांमुळे शरीराला लोह मोठ्या प्रमाणात मिळते. बाहेरून आयर्न सप्लिमेंट्स घ्यायची गरज पडत नाही. आधीच्या काळी सर्वांच्या घरी किमान एक लोखंडी कढई आणि तवा दिसून येत; परंतु नेरलेस, नॉनस्टिक, प्‍लॅस्‍टिक आल्यामुळे घरातील लोखंडी वस्तू गंज खाऊन भंगारात निघाल्या होत्या, मात्र लोखंडी भांड्यांचे महत्त्व आता समजू लागल्‍याने गृहिणींकडून त्‍यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.
....................
लोखंडी तव्यावर भाजलेली भाकरी, चपाती, तसेच भाजी लोखंडी कढईत शिजवल्यास लोहाचा चांगलाच अंश त्यात उतरतो. फक्त एकदा पदार्थ शिजला की तो लगेच दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावा, म्हणजे काळपट पडत नाही आणि चवही बदलत नाही. शरीरात हवे असलेले लोहदेखील चांगल्या प्रमाणात मिळते. त्यामुळे लोखंडी भांड्यांचा वापर सर्वांनी केला पाहिजे.
प्रभुलाल लिंबा चौहान, भांडीविक्रेते, राजस्थान


फोटो

माणगावमधील मोरबा रोडवरील दोन्ही बाजूस लोखंडी भांडी विक्रीस आलेली दिसत आहेत. (छाया – परेश शिंदे, माणगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com