अपस्मार रुग्णांसाठी ‘केईएम’ वरदान
अपस्मार रुग्णांसाठी ‘केईएम’ वरदान
७२० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
मुंबई,ता. १९ : केईएम रुग्णालयातील न्यूरोलॉजी विभाग सक्षम झाला असून येथे अपस्मार रुग्णांसाठी नवनवीन उपचारपद्धतींचा अवलंब करण्यात येत आहे, मात्र २४ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या इंटेसिव्ह एपिलेप्सी केअर सेंटरमुळे आतापर्यंत ७२० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे केंद्र अपस्मार रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.
आकडी येऊन पडण्याच्या त्रासामुळे अपस्मार असलेल्या रुग्णाला बाहेर फिरण्यास मोठ्या अडचणी निर्माण होतात. ही अडचण लक्षात घेऊन केईएम रुग्णालयात न्यूरोलॉजी विभाग सक्षम करण्यावर पहिल्यापासूनच भर देण्यात येत आहे. २००१ साली केईएम रुग्णालयात ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह एपिलेप्सी केअर सेंटर’ सुरू करण्यात आले. त्याद्वारे मिळणारे उपचार व केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे अनेकांच्या आयुष्यात खूप बदल घडले आहेत. या रुग्णालयामुळे आजतागायत ७२० एपिलेप्सी रुग्णांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल झाला आहे.
केईएम रुग्णालयात डॉक्टरांची एक टीम असून यामध्ये न्यूरोलॉजिस्ट आणि रेडिओलॉजिस्ट यांचा समावेश आहे. याबद्दल अधिष्ठाता न्यूरोलॉजिस्ट डॉ. संगीता रावत यांनी सांगितले की, बहुतांश रुग्णांना औषधांचा फायदा होतो, मात्र सुमारे २० ते ३० टक्के रुग्णांवर औषधांचा परिणाम होत नाही. अशा रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज भासते. रुग्णालयाने २००१ पासून ७२० हून अधिक अपस्मार रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत, तर दर आठवड्याला आमच्याकडे ६० ते ७० अपस्माराचे रुग्ण येतात.
शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाचे मूल्यांकन केले जाते. या कामात डॉक्टर मागील काही ईईजी पाहतात. डॉ. रावत यांच्या मते, व्हिडिओ ईईजी मशीन रुग्णालयांना अधिक रुग्णांचे मूल्यांकन करण्यात आणि शस्त्रक्रिया करण्यात मदत करते. न्यूरोलॉजिकल विभागातील डॉक्टरांनी सांगितले की, ईईजीजीद्वारे रुग्ण काय करत आहे, त्याला काय अनुभव येत आहे, याची नोंद होते. शस्त्रक्रियेचा निर्णय पहिले तीन दिवस रुग्णाची तपासणी केल्यानंतर घेतला जातो.
...................................
आजारपणापासून मुक्त व्हा
डॉक्टरांच्या मते, ७० ते ८० टक्के रुग्णांचे झटके, तर २० टक्के रुग्णांना सहा महिन्यांतून किंवा वर्षातून एखाद्या वेळेस अपस्माराचे झटके येतात, असे रुग्ण आधी दिवसाला पाच ते सहा औषधे घेत असत, मात्र आता केवळ एकच औषध त्याला घ्यावे लागते. त्यामुळे अपस्माराचे झटके येणाऱ्या रुग्णांसाठी शस्त्रक्रिया एक चांगला पर्याय आहे.
..................................
एपिलेप्सी म्हणजे काय?
एपिलेप्सी (अपस्मार) हा एक मेंदूचा आजार आहे, ज्यामुळे रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक झटका येतो. बऱ्याचदा शुद्ध हरपते. जनजागृतीच्या अभावामुळे याबाबत अनेक प्रकरणे नोंदवली जात नाहीत. सर्व वयोगटातील लोकांना या स्थितीचा त्रास होऊ शकतो. एपिलेप्सीच्या लक्षणांमध्ये शुद्ध हरपणे, स्नायूंचा ताठरपणा, अचानक कोसळणे आणि हाता-पायांना मुंग्या येणे, ज्ञानेंद्रियांवर परिणाम होणे, भीती वाटणे यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

