महिला सांभाळणार संपूर्ण मतदान केंद्र
महिला सांभाळणार संपूर्ण मतदान केंद्र
सखी मतदान केंद्रांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९: लोकशाहीच्या उत्सवासाठी अर्थातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानासाठी दोन लाख २१ हजार ६० बॅलेट युनिटचा वापर केला जाणार आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार, मुंबई शहरात एकूण १२ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत, तर मुंबई उपनगरात २६ महिला नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत.
महिला नियंत्रित मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून विधानसभा निवडणुकीसाठी महिला नियंत्रित महिला मतदान केंद्रे असणार आहेत. वडाळा येथील वीर जिजामाता तंत्रज्ञान संस्था येथे असलेल्या ३१ व्या मतदान केंद्राचे रूपांतर सखी मतदान केंद्रात करण्यात आले आहे. या मतदान केंद्रातील सर्व मतदान प्रक्रियेची धुरा महिला सांभाळणार आहेत. या मतदान केंद्राला विशेषतः गुलाबी रंगाने सजवण्यात आले असून मतदारांना आपले मतदान केंद्र सहज सापडण्यास मदत होणार आहे.
सखी मतदान केंद्रावर एकूण पाच महिला अधिकारी आणि एक महिला पोलिस शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह दोन राखीव महिला देण्यात आल्या आहेत. ज्यामुळे मतदारांची गर्दी, त्यांना पाण्याची, बसण्याची सोय करण्यापासूनची सर्व जबाबदारी या महिलांची असेल. विशेष म्हणजे येणाऱ्या पहिल्या १० ते १२ मतदारांचे पुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे. सखी मतदान केंद्रावर ५७७ स्त्री मतदार आहेत, तर ५६१ पुरुष मतदार असून, दिवसभरात एकूण ११३८ मतदार मतदान करतील.
१८० विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली चव्हाण यांनी सांगितले की, १८० विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी १५०० कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. नवीन मतदारयादी तयार करण्याचे काम कायम सुरू असते, पण लोकसभा निवडणुकीनंतर मतदान केंद्रांची पुनर्रचना केली गेली. त्यात एकसूत्रीपणा आणला आहे. येणाऱ्या प्रत्येक मतदाराला ओळखपत्र वाटण्यात आले आहे, शिवाय मतदान केंद्रावर पाण्याची, आसन व्यवस्था, प्रतीक्षालय, स्वच्छतागृह, वैद्यकीय मदत कक्ष, पाळणाघराची सोय करण्यात आली आहे, शिवाय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून नेमण्यात आले आहे, जे ज्येष्ठ नागरिकांना मदत करतील.
हरित मतदान केंद्र
वडाळा बस स्टॉप येथे हरित मतदान केंद्र तयार केले आहे. इथे येणाऱ्या पहिल्या मतदारांना छोटी रोपटी दिली जाणार आहेत. यासह आजूबाजूचा परिसरही हिरवागार सजवण्यात आला आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट इथल्या सखी मतदान केंद्रालाही विशेष गुलाबी रंगाने सजवण्यात आले आहे. ११४ मतदान केंद्रांत महिलांचे मोठे बॅनर्स, पोस्टर्स ठेवण्यात आले आहेत. यासह महिलांसाठी मतदानासंबंधी विशेष संदेश लिहिण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

