जिल्ह्यात ७२ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

जिल्ह्यात ७२ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Published on

७२ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क
सहा हजार ८९४ मतदान केंद्र सज्ज
सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १९ : आली घटिका समीप, असे म्हणत मागील महिनाभरापासून प्रतीक्षेत असलेला मतदानाचा दिवस अखेर उजाडला आहे. बुधवारी (ता. २०) जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यात ७२ लाख २९ हजार ३३९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी सहा हजार ८९४ मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. मतदान केंद्रांवर काम करण्यासाठी ३० हजार ८६८ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, तसेच निवडणुका भयमुक्त वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक पोलिस यंत्रणा व केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान सज्ज आहेत. मतदानादिवशी मतदान केंद्रांवर कोणतीही गर्दी होणार नाही व सर्व मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी ठाणे जिल्हा निवडणूक विभागदेखील सज्ज झाला आहे.

ठाणे जिल्हा निवडणूक विभागदेखील सज्ज झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, तसेच मतदान केंद्र व मतमोजणी केंद्राच्या ठिकाणावरील विषयाबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी स्थानिक पोलिस दलाबरोबरच मतमोजणी केंद्रांवर, तसेच मतदान केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. या जवानांनी मतदान केंद्रावर गर्दी होऊ नये, यासाठी काळजी घ्यावी. सर्व नागरिकांना, तसेच मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या मदतीने मतदान खोलीतील व्यवस्थापन सुरळीत होईल, याकडे लक्ष देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी शिनगारे यांनी दिली. मतदानासाठी रांगेचे व्यवस्थापन, तसेच गर्दीचे व्यवस्थापन करताना स्थानिक पोलिस यंत्रणांबरोबरच केंद्रीय सुरक्षा यंत्रणांची मदत होईल, तसेच संवेदनशील व गर्दी होणाऱ्या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही दिल्याचे शिनगारे यांनी या वेळी सांगितले.

ठाणे जिल्ह्यात १५ कोटी ५९ लाखांची रोकड जप्त
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची धामधूम सुरू आहेत. अशातच मतदानाच्या आधी मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी पैशांचा वापर होत असतो. त्यामुळे या गोष्टींवर आळा घालण्यासाठी निवडणूक विभागाकडून आचारसंहिता भरारी पथक स्थापन करण्यात येत असतात. या पथकाकडून आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापार्यंत १५ कोटी ५९ लाख चार हजारांची रोकड जप्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत जप्त केलेल्या रोख रकमेपेक्षा ही रक्कम अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ड्रोनच्या सहाय्याने नजर
मतदान केंद्राच्या परिसरात अपुरी जागा असेल तेथे विशेष काळजी घेण्याचे निर्देश या वेळी केंद्रीय निरीक्षकांनी दिले, तसेच गर्दी होणाऱ्या ठिकाणी, जेथे मतदारांच्या जास्त रांगा लागतात अशा परिसरात ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात यावेत. मतदान प्रक्रियेसंदर्भात अथवा मतदानास उशीर होत असल्यासंदर्भात कोणतीही अफवा पसरवू नये, यासाठी समाजमाध्यमांवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही केंद्रीय निरीक्षकांनी या वेळी दिले. प्रत्येक मतदान केंद्रांवर पुढील ७२ तास महत्त्वाचे आहेत. अवैध मद्य वाहतूक, अवैध रोकड वाहतूक आदींवर भरारी पथकाने लक्ष ठेवावे, अशा सूचनाही केंद्रीय निरीक्षकांनी या वेळी दिल्या.

१८ मतदान केंद्रांसाठी दिव्यांग सक्षम
जिल्ह्यातील दिव्यांग अधिकारी व कर्मचारी हे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतही हे सक्रियपणे कार्यरत आहेत. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एक मतदान केंद्रांचे संपूर्ण संचालन हे दिव्यांग अधिकारी, कर्मचारी सक्षमपणे करण्यास सज्ज झाले आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्र पुढीलप्रमाणे भिवंडी ग्रामीण- मतदान केंद्र क्र. २०, शहापूर मतदान केंद्र क्र. १५४, भिवंडी पश्चिम - मतदान केंद्र क्र. ६७, भिवंडी पूर्व- मतदान केंद्र क्र. १०३, कल्याण पश्चिम - मतदान केंद्र क्र. १८२, मुरबाड - मतदान केंद्र क्र. ३१९, अंबरनाथ - मतदान केंद्र क्र. २०, उल्हासनगर - मतदान केंद्र क्र. २२०, कल्याण पूर्व - मतदान केंद्र क्र. १६८, डोंबिवली - मतदान केंद्र क्र. १८४ , कल्याण ग्रामीण- मतदान केंद्र क्र. २३५, मिरा-भाईंदर मतदान केंद्र क्र. ६४ , ओवळा-माजिवडा- मतदान केंद्र क्र. ३४७, कोपरी-पाचपाखाडी- मतदान केंद्र क्र. ३०६, ठाणे - मतदान केंद्र क्र. ३३३, कळवा-मुंब्रा- मतदान केंद्र क्र. १२०, ऐरोली - मतदान केंद्र क्र. १४५, बेलापूर - मतदान केंद्र क्र. २३४.

‘महिला शक्ती’ही सज्ज
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही मतदान केंद्रांवर महिला शक्तीची छाप दिसणार आहे. १९ मतदान केंद्रांवर पूर्णपणे महिला कर्मचारी कामकाज पाहणार आहेत. सहाजिक आपले वेगळेपण दिसावे, यासाठी खास पेहरावासह मतदान केंद्रांवर रांगोळी काढण्यात येणार आहे.
विधानसभानिहाय सखी मतदान केंद्र भिवंडी ग्रामीण- मतदान केंद्र क्र. २५९, शहापूर - मतदान केंद्र क्र. - १७१, भिवंडी पश्चिम- मतदान केंद्र क्र. १६७, भिवंडी पूर्व- मतदान केंद्र क्र. ३१७, कल्याण पश्चिम- मतदान केंद्र क्र. २९२, मुरबाड- मतदान केंद्र क्र. २४१, अंबरनाथ- मतदान केंद्र क्र. १९, उल्हासनगर- मतदान केंद्र क्र. ९५, कल्याण पूर्व - मतदान केंद्र क्र. ११८, डोंबिवली- मतदान केंद्र क्र. २६१, कल्याण ग्रामीण- मतदान केंद्र क्र. १८९ , मिरा-भाईंदर, ओवळा-माजिवडा- मतदान केंद्र क्र. ४८४, कोपरी-पाचपाखाडी - मतदान केंद्र क्र. १९९, ठाणे- मतदान केंद्र क्र. ३१९, कळवा- मतदान केंद्र क्र. ५०, ऐरोली- मतदान केंद्र क्र. १५६, बेलापूर- मतदान केंद्र क्र. १२८.


पर्दानशीन केंद्र
सखी मतदार केंद्रासह या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाने पर्दानशीन मतदार केंद्र ही अभिनव संकल्पनाही राबवली आहे. मुस्लिमबहुल परिसर असलेल्या मतदारसंघातील केंद्रांत मुस्लिम महिलांना मोकळेपणाने आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी ही व्यवस्था केली आहे. भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व व कळवा मुंब्रा या ठिकाणी पर्दानशीन मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com