भावी नगरसेवकांना मुख्यमंत्र्याची तंबी
भावी नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांची तंबी
ठाण्यातील मतदानाचा टक्का वाढविण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा, मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढा, त्याचबरोबर गाफील राहू नका, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या माजी नगरसेवकांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिला, तसेच या निवडणुकीवरच तुमचे महापालिका निवडणुकीचे प्रगती पुस्तक तयार होणार असल्याचा इशारादेखील त्यांनी दिला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर सोमवारी (ता. १८) ठाण्यात भाजपच्या कार्यालयात महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, आदींसह शिंदे सेनेसह भाजपमधील माजी नगरसेवकांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणून माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन व योग्य पद्धतीने काम केल्याने चांगले मतदान झाले. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतदेखील काम करायचे आहे. गाफील राहू नका, प्रत्येक मतदारापर्यंत जा, त्यांच्यापर्यंत वोटर स्लिप पोहोचल्या आहेत की नाही? याची माहिती घ्या, मतदारांना मतदान करण्यासाठी बाहेर काढा, मतदानाचा टक्का वाढवा. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मागे पडला आणि तुमच्या प्रभागात जर महायुतीच्या उमेदवाराला कमी मते मिळाली, तर लक्षात ठेवा महापालिका निवडणुका लवकरच येतील, तेव्हा तुम्हाला तिकिटाला मुकावे लागेल, अशा शब्दांत शिंदे यांनी सोमवारी रात्री कार्यकर्त्यांना खासगी बैठकीत तंबी दिली आहे. ही निवडणूक तुमचे प्रगती पुस्तक ठरविणारी असल्याने जोमाने कामाला लागण्याचा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर राज्याची जबाबदारी असल्याने त्यांना ठाण्यात हवे तसे सभा किंवा रॅलीतही सहभागी होता आले नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना ऊर्जा देण्यासाठी आणि नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी ही बैठक घेतल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

