

ठाणे शहर, ता. २४ (बातमीदार) : जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध असतानाच आता मुलांचीही काळजी घेतली गेली आहे. रुग्णांच्या मुलांसाठी रुग्णालयात एक ‘खाऊचा कोपरा’ तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी मुलांना पौष्टिक पदार्थ मोफत मिळणार आहेत. त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, चिक्की, चिवडा, फळे आदींचा समावेश असणार आहे.
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वसामान्य, गरीब घरातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. अनेकदा रुग्णांसोबत लहान मुलेही असतात. त्यांना सांभाळण्यासाठी घरी कोणी नसते. त्यामुळे या मुलांना रुग्णालयात यावे लागते. रुग्णांच्या नातेवाईकांसोबतही अनेक मुले येत असतात. येथे आल्यावर या मुलांना खाण्यासाठी पौष्टिक पदार्थ मिळत नाहीत. ते शरीराला अपायकारक असलेले निकृष्ट दर्जाचे, उघड्यावरील पदार्थ विकत घेऊन खातात. ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने मुलांच्या आरोग्यासाठी ही योजना आखली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात ‘खाऊचा कोपरा’ ही संकल्पना राबवली, अशी माहिती आहार तज्ज्ञ डॉ. शीतल नागरे यांनी दिली.
रुग्णालयात वॉर्डच्या एका कोपऱ्यात सकस व पौष्टिक आहार उपलब्ध करून दिला आहे. त्या ठिकाणी विविध बरण्यांमध्ये भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, चिवडा, चिक्की असे पदार्थ आणि फळे ठेवली आहेत. तेथून मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे खाऊ निवडून खाता येणार आहे. ही योजना गुरुवार (ता.२१)पासून सुरू केली आहे. याप्रसंगी नेत्र शल्यचिकित्सक डॉ. संगीता माकोडे, भूलतज्ज्ञ डॉ. प्रियांका महंगाडे, डॉ. अर्चना पवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश वानखेडे, डॉ. गोपणपल्लिकर, विनोद जोशी, अधिसेविका प्रतिभा बर्डे आदी उपस्थित होते.
रुग्णालयात फिरताना अनेकदा लहान मुले वडापाव, चायनीज किंवा इतर चमचमीत खाद्य पदार्थ खाताना दिसून आले. खटकणारी ही बाब दिसताच जेवणाव्यतिरिक्त मधल्या वेळेत या मुलांना पौष्टिक खाद्य पदार्थ देतात येतील का, असा विचार मनात आला. तो विचार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांना सांगितला असता त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून खाऊचा कोपरा सुरू करण्याची परवानगी दिली.
- डॉ. शीतल नागरे, आहारतज्ज्ञ
रुग्णांबरोबर रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत सकस जेवण दिले जाते. जिल्हा आता लहान मुलांना देखील ‘खाऊचा कोपरा’ या संकल्पनेतून सकस पोषण आहार दिला जाणार आहे. या संदर्भातील जनजागृतीचे पोस्टर लावण्यात आले आहेत. जेणेकरून रुग्णांच्या पालकांना या खाऊच्या कोपऱ्याची माहिती मिळू शकेल आणि अशाच पद्धतीचा सकस आहार ते त्यांच्या बाळाला घरीही देऊ शकतील.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.