नोटाने घेतली हजारो मते

नोटाने घेतली हजारो मते
Published on

अलिबाग, ता. २४ (बातमीदार) ः विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातून महायुतीचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. भरघोस मतदान झाले असले तरी मात्र महाड विधानसभा मतदारसंघाचा अपवादवगळता जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात मतदारांनी हजारांच्या संख्येत ‘नोटा’ला (वरीलपैकी कोणीही नाही) या पर्यायाला मते दिल्‍याचे उघड झाले आहे. श्रीवर्धन मतदारसंघात सर्वाधिक ३,३७५ मते नोटाला मिळाली आहेत.
अलिबाग विधानसभा मतदारसंघात महायुतीचे महेंद्र दळवी यांना १,१३,५९९ मते, महाविकास आघाडीच्या चित्रलेखा पाटील यांना ८४,०३४ मते तर अपक्ष दिलीप भोईर यांना ३३,२१० मते मिळाली आहेत. अलिबाग मतदारसंघात नोटाला चौथ्या क्रमांकाची म्हणजेच १,६५८ मते मिळाली आहेत. पेण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे रविशेट पाटील यांना १,२४,६३१ मते, महाविकास आघाडीचे प्रसाद भोईर यांना ६३,८२१ मते, शेकापचे अतुल म्हात्रे यांना २९,१९१ मते मिळाली आहेत. पेण मतदारसंघात नोटाला चौथ्या क्रमांकाची म्हणजेच २,४७३ मते मिळाली आहेत. महाड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे भरत गोगावले यांना एक लाख १७ हजार ४४२ मते, महाविकास आघाडीच्या स्नेहल जगताप यांना ९१ हजार २३२ मते मिळाली आहेत. महाड मतदारसंघात नोटाला ८८९ मते मिळाली आहेत.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या आदिती तटकरे यांना १,१६,०५० मते, महाविकास आघाडीचे अनिल नवगणे यांना ३३,२५२ मते, अपक्ष राजाभाऊ ठाकूर यांना ४,०८० मते मिळाली आहेत. श्रीवर्धन मतदारसंघात नोटाला चौथ्या क्रमांकावर ३,३७५ मते मिळाली आहेत. कर्जतमध्ये महायुतीचे महेंद्र थोरवे यांना ९४,८७१ मते, अपक्ष सुधाकर परशुराम घारे यांना ८९,१७७ मते, महाविकास आघाडीचे नितीन सावंत यांना ४८,९२९ मते, अपक्ष सुधाकर यादवराव घारे यांना २,३६१ मते मिळाली आहेत. कर्जत मतदारसंघात नोटाला पाचव्या क्रमांकावर १,९५६ मते मिळाली आहेत.
पनवेल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे प्रशांत ठाकूर यांना १,८३,९३१ मते, शेकापचे बाळाराम पाटील यांना १,३२,८४० मते, महाविकास आघाडीच्या लीना गरड यांना ४३,९८९ मते, मनसेचे योगेश चिले यांना १०,२३१ मते मिळाली आहेत. पनवेल मतदारसंघात नोटाला पाचव्या क्रमांकावर ३,९०५ मते मिळाली आहेत. उरण विधानसभा मतदारसंघात महायुतीचे महेश बालदी यांना ९५,३९० मते, शेकापचे प्रीतम म्हात्रे यांना ८८,८७८ मते, महाविकास आघाडीचे मनोहर भोईर यांना ६९,८९३ मते मिळाली आहेत. उरण मतदारसंघात नोटाला चौथ्या क्रमांकावर २,६५३ मते मिळाली आहेत. जिल्‍ह्यातील एकूणच मताधिक्‍य पाहता, प्रमुख उमेदवारांनंतर अपक्षांपेक्षा नोटाने सर्वात जास्‍त मते घेतल्‍याचे दिसून येत आहे.

नोटा म्हणजे काय?
भारतात प्रामुख्याने २०१३ पासून नोटा हा पर्याय मतदान प्रक्रियेत वापरण्यास सुरुवात झाली. मतदान यंत्र म्हणजेच ईव्हीएमवर सर्व उमेदवारांच्या खाली नोटा हे बटण दिलेले असते. मतदान यंत्रावरील उमेदवारांपैकी कोणताही उमेदवार पसंत नसल्यास ‘नोटा’चा पर्याय दाबून नापसंती दर्शवण्याचा अधिकार मतदारांना आहे.
अलिबाग, पेण, श्रीवर्धन, उरणमध्ये चौथ्या क्रमांकावर ‘नोटा’ची मते असून, कर्जत आणि पनवेलमध्ये पाचव्या क्रमांकावर ‘नोटा’ला मते मिळाली आहेत. तर, महाडमध्ये नोटाची मते सहाव्या क्रमांकावर आहेत.

जिल्‍ह्यातील मतदारसंघनिहाय नोटाची मते
अलिबाग : १,६५८
पेण : २,४७३
कर्जत : १,९५६
महाड : ८८९
श्रीवर्धन : ३,३७५
पनवेल : ३,९०५
उरण : २,६५३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com