निवडणुकीत ३४२ उमेदवारांचे डिपॉझिट गुल!

निवडणुकीत ३४२ उमेदवारांचे डिपॉझिट गुल!
Published on

निवडणुकीत ३४२ उमेदवारांचे डिपॉझिट गुल!
- नवाब मालिकांसह मनसे, वंचितचा समावेश; २६० अपक्षांनाही झटका
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : विधानसभेच्या निवडणूक रिंगणात अनेक उमेदवारांनी लाखांहून अधिक मते घेतली असली तरी कित्येक उमेदवारांना आपले डिपाॅझिटही राखता आले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईच्या निवडणूक आखाड्यात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्यासह मनसे, वंचित बहुजन आघाडी, बसपाबरोबरच जवळपास ३४२ उमेदवारांना अल्प मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाकडे भरलेले डिपाॅझिट जप्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना संबंधित उमेदवारावा निवडणूक आयोगाकडे १० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. निवडणूक निकालानंतर संबंधित उमेदवाराला झालेल्या एकूण मतदानापैकी किमान १/६ म्हणजे १६.३३ टक्के एवढी मते घेतली असतील, तर त्यांनी भरलेली डिपाॅझिटची रक्कम परत केली जाते. त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास सदरची रक्कम जप्त केली जाते. मुंबई शहर आणि उपनगरातील ३६ विधानसभा मतदारसंघांतून ४२० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. शनिवारी जाहीर झालेल्या निकालानुसार ३४२ उमेदवारांना आपले डिपाॅझिट गमवावे लागणार असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे ८२ उमेदवार असून २६० अपक्ष उमेदवार आहेत. त्याशिवाय वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, एमआयएमचाही समावेश आहे.

मानखुर्दमध्ये मलिकांवर नामुष्की
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांनी आपला अणुशक्तीनगर हा परंपरागत मतदारसंघ मुलीला सोडत मानखुर्द शिवजीनगरमधून निवडणुकीला सामोरे गेले होते, मात्र तेथे अबू आझमी ५४ हजार मते घेऊन विजयी झाले. एमआयएमचे उमेदवार अतिक खान हे ४२ हजार मते घेत दुसऱ्या स्थानावर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सुरेश पाटील यांनी ३५ हजार मते घेत आपले डिपाॅझिट राखले आहे, मात्र नवाब मलिक चौथ्या स्थानावर असून त्यांना केवळ १५ हजार ५०१ मते मिळाली आहेत. या मतदारसंघात दीड लाखांहून अधिक मतदान झालेले असल्याने डिपाॅझिट राखण्यासाठी २४ हजारांहून अधिक मतांची आवश्यकता होती, मात्र ती न मिळाल्याने मलिकांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढावली आहे.

मनसेला १३ ठिकाणी धक्का
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील वेगवगेळ्या २५ जागा लढवल्या होत्या. त्यामध्ये जवळपास १३ ठिकाणी त्यांच्या उमेदवारांना अल्प मते मिळाली असल्याने त्यांचे डिपाॅझिट जप्त होणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, मनसेने दिंडोशी, विक्रोळी, भांडुप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, अणुशक्तीनगर, माहीम, वरळी आणि शिवडी या मतदारसंघांत चांगली मते घेतली आहेत.

निवडणूक आयोग मालामाल, ३४ लाखांची कमाई
निवडणूक रिंगणात उतरलेल्या अर्ध्याहून अधिक उमेदवारांना आपले डिपाॅझिट राखण्या एवढीही मते घेता आलेली नाहीत. त्यामुळे त्यांनी अर्ज भरताना आयोगाकडे जमा केलेली १० हजार रुपयांची अनामत रक्कम थेट निवडणूक आयोगाच्या तिजोरीत जमा होणार आहे. मुंबईतील ३४२ उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त होणार असल्याने आयोगाला त्या माध्यमातून ३४ लाख २० हजार रुपयांची कमाई होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्याने दिली.

निवडणूक रिंगणातील एकूण उमेदवार - ४२०
डिपाॅझिट जप्त होणार - ३४२
अपक्ष - २६०
बसपा - २५
वंचित बहुजन आघाडी - २३
मनसे - १३
इतर - २१

निवडणूक रिंगणात हौस म्हणून अनेक जण उतरत असल्याने मतविभागणी होत आहे. त्यामुळे एखाद्या उमेदवाराला २५-३० टक्के मते पडली तरी तो विजयी होतो. परिणामी निवडणूक रिंगणात उमेदवारांची जत्रा निर्माण होऊ नये म्हणून सध्या १० हजार रुपये असलेली डिपाॅझिटची रक्कम आयोगाने एक लाखाहून अधिक ठेवावी.
- जयंत माईनकर, राजकीय विश्लेषक

सध्या ज्यांना घरातली मते पडत नाहीत, तेही निवडणूक लढवतात. ते का निवडणूक लढवतात याचे लाॅजिक कळत नाही. त्यामुळे अशा उमेदवारांना थेट अडवता येत नसले तरी अनामत रक्कम वाढवून त्यांची संख्या कमी करण्यावर आयोगाने विचार करावा.
- राजू परुळेकर, राजकीय विश्लेषक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com