

समतेच्या वारीचा नऊ जिल्ह्यांत जागर
मंगळवेढ्यातून १ जानेवारीला प्रस्थान; १२ जानेवारीला देहूत समारोप
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २४ : समतेच्या विचाराचा प्रचार करण्यासाठी सुरू झालेल्या ‘चोखोबा ते तुकोबा’ एक वारी समतेची या उपक्रमाचे यंदा सातवे वर्ष असून या वारीचा प्रारंभ बुधवारी (ता. १) श्री संत चोखामेळा महाराजांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा येथून होणार असून समारोप रविवारी (ता. १२) जगद्गुरू संत तुकोबाराय यांची जन्मभूमी असलेल्या देहूगाव येथे होणार असल्याची माहिती समता वारीचे निमंत्रक सचिन पाटील यांनी दिली.
पाटील यांनी सांगितले की, संतांनी सांगितलेल्या समता, मानवता आणि बंधुभाव या मूल्यांचा जागर हाच समता वारीच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. भेदभाव विरहित एकसंध समाजनिर्मितीचे समाजसुधारक गणपती महाराज यांनी पाहिलेल्या स्वप्नपूर्तीसाठी समता वारी कार्यरत आहे. ‘चोखोबा ते तुकोबा'' एक वारी समतेची २०२५ पोस्टरचे अनावरण मंगरूळ दस्तगीर (जि. अमरावती) येथील गणपती स्मृतिमंदिरात गणपती महाराज यांच्या पणती सुनयना अजात यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गणपती महाराज यांचे नातू श्याम महाराज भबुतकर, पुष्पलता भबुतकर, मनोज भबुतकर, मच्छींद्रनाथ भबुतकर, सुशील भबुतकर, चैतन्यप्रभू भबुतकर, रेखा बभुतकर समता वारी निमंत्रक सचिन पाटील, शरदराव गायकवाड, पार्थबन सिल्वराज आदी उपस्थित होते.
...........
असा असेल समता वारीचा प्रवास
समात वारीचा प्रारंभ सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथून होणार आहे. मंगळवेढा- पंढरपूर-अरण-सोलापूर-अक्कलकोट-उमरगा-माकणी-औसा-तुळजापूर-धाराशिव- तेर-कसबे तडवळे-येरमाळा-भूम-पाथरुड-खर्डा-जामखेड-सावरगाव घाट- गहिनीनाथगड-पाथर्डी-पैठण-जालना-सिंदखेडराजा-मेहुणाराजा-देऊळगावराजा- संभाजीनगर-नेवासा-शिर्डी-ताहराबाद-नगर-पिंपळनेर-राळेगणसिद्धी-शिरूर-कोरेगाव भीमा-वढू बुद्रूक-वाघोली-पुणे-आळंदी या मार्गे येऊन देहूगाव येथे जाणार आहे. ही वारी नऊ जिल्ह्यांतून जाणार असून १७५० किलोमीटर प्रवास करणार आहे.
............
अशी असेल वारी
संतांनी सांगितलेल्या समता, बंधुता व मानवता या विचारांचे दर्शन घडवणारी चित्रफीत वारी मार्गावर दाखवण्यात येते. शाळा, महाविद्यालय, वाड्या-वस्ती, गावे, शहरे या ठिकाणी जाऊन वारीदरम्यान प्रबोधन करण्यात येते. माणसा-माणसातील वाढत चाललेली दरी कमी होऊन समाजात बंधुभाव वाढीस लागावा, समाजातील जातीय-धार्मिक विद्वेष कमी होऊन आपापसांत बंधुभाव वाढावा यासाठी समता वारीचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.
......
SLP24C64874
मंगळूर दस्तगीर : समता वारीच्या पोस्टरचे अनावरण करताना सुनयना अजात, श्याम महाराज भबुतकर, सचिन पाटील, चैतन्यप्रभू भबुतकर, रेखा बभुतकर आदी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.