

बाराशे डबल डेकर येणार
बेस्टच्या अर्थसंकल्पात तरतूद; पालिकेकडून मदतीची अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ ः बेस्टच्या ताफ्यात सध्या दोन हजार ८१ भाडेतत्त्वावरील बस आणि एक हजार ८५ स्वमालकीच्या बस गाड्यांसहित एकूण तीन हजार १६६ बसगाड्या आहेत. बेस्टच्या प्रवाशांच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याने आगामी वर्षात बेस्टच्या ताफ्यात बसची संख्या वाढवली जाणार आहे. बेस्टच्या वाहतूक विभागाने दोन हजार १०० एक मजली ई-बस भाडेतत्त्वावर घेण्याकरिता कार्यादेश दिला आहे. आता येत्या वर्षात बेस्ट उपक्रमाकडून आणखी १,२०० दुमजली ई-बस घेण्यात येणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात याची तरतूद करण्यात आली आहे.
बेस्टचा सध्याचा ताफा कमी झाल्याने त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दोन हजार ६५० एकमजली इलेक्ट्रिक बसगाड्यांसाठी कार्यादेश दिला आहे. या बस भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत; मात्र वर्ष लोटले तरी अद्याप एकही बस ताफ्यात आलेली नाही. येत्या वर्षात आणखी नवीन १,२०० नवीन बस ताफ्यात आणल्या जाणार आहेत. अर्थसंकल्पात तशी तरतूद केली आहे. बेस्ट उपक्रमाने, २०२६-२७ या वर्षात १०० टक्के शून्य उत्सर्जन इलेक्ट्रिक बसताफा साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले आहे. नैसर्गिक इंधनावर प्रवर्तित होणाऱ्या बसच्या जागी पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसगाड्या चालविण्याचे वाहतूक विभागाचे महत्त्वाचे धोरण आहे. २०२५-२६ या वर्षापर्यंत उपक्रमाच्या बसताफ्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक इलेक्ट्रिक बसगाड्यांचा समावेश करणे आणि त्यानंतरच्या वर्षामध्ये या इलेक्ट्रिक बसगाड्यांच्या संख्येमध्ये आठ हजारांपर्यंत वाढ करणे हे बेस्ट वाहतूक विभागाने उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार मार्च २०२६पर्यंत बसताफा १० हजार १८२ करण्याचे नियोजन बेस्टचे आहे. या वर्षात ५१० बस मोडित काढण्यात येणार आहेत. त्यामुळे नव्या बस घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी ६८९ कोटी ५१ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. २०२६पर्यंत बेस्टचा स्वमालकीचा बस ताफा तीन हजार ३३७ वर जाणार असून भाडेतत्त्वावरील बसताफा हा सहा हजार ८४५च्या वर नेण्याचे बेस्टचे उद्दिष्ट आहे.
..
पालिकेकडून हवी २,८१२ कोटींची मदत
बेस्ट प्रशासनाला गेल्या पाच वर्षांत मुंबई महापालिकेने तब्बल ८,५९४ कोटी रुपये देऊनही बेस्टने आणखी या वर्षांत २,८१२ कोटींची मागणी पालिकेकडे केली आहे. नव्या बसची खरेदी आणि प्रशासकीय खर्चासाठी हा निधी वापरला जाणार असल्याचे समजते. बेस्टने परिवहन उपक्रमात २,१३२.५२ कोटी तूट असलेला अर्थसंकल्प पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांना सादर केला. बेस्टची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांपासून डबघाईला आल्याचे समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.