

मनोर/कासा, ता. ३ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील निर्माणाधीन उड्डाणपुलांच्या कामांची धीमी गती वाहतूक कोंडीला कारण ठरत आहे. उड्डाणपुलांची कामे रखडल्यामुळे सेवा रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीमुळे चालकांची गैरसोय होत आहे. पावसाळा संपल्यानंतरही पुलांच्या कामांनी वेग धरला नसल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे.
अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे महामार्गावर आच्छाड, नांदगाव फाटा, जव्हार फाटा आणि सातिवली येथे उड्डाणपूल उभारले जात आहेत. महामार्गावरील रोड क्रॉसिंगच्या ठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली होती. रोड क्रॉसिंगवरील अपघात रोखण्यासाठी मंजूर उड्डाणपुलांची कामे एप्रिलमध्ये सुरू करण्यात आली.
मुंबई, गुजरात आणि दिल्लीला जोडणारा मुंबई-अहमदाबाद हा एकमेव मार्ग असल्याने महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. सहा पदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर महामार्गावरील वाहनांच्या वेगात वाढ झाली आहे. महामार्गावर धावणारी अवजड वाहने ताशी ७० ते ८० किलोमीटर, तर चारचाकी प्रवासी वाहने आणि कार १०० ते १२० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादेत चालवली जात आहेत. सहा पदरीकरणाच्या कामादरम्यान महामार्गावर रोड क्रॉसिंग असलेल्या ठिकाणी उड्डाणपुलांचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु अनेक क्रॉसिंगच्या ठिकाणी उड्डाणपूल नसल्याने पादचारी आणि वाहनचालकांना धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडावा लागत होता. त्यामुळे रोड क्रॉसिंगवर अपघातांची संख्या वाढून झालेल्या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला होता.
धोकादायक क्रॉसिंगच्या ठिकाणी उड्डाणपुलांच्या निर्मितीसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी तत्कालीन खासदार राजेंद्र गावित यांनी महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला होता. यामुळे उड्डाणपुलांचे बांधकाम आणि वळणे काढण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि रस्ते विकास मंत्रालयातून चार कोटी ८० लाखांचा निधी उपलब्ध झाला. महामार्गावरील धोकादायक क्रॉसिंग असलेल्या ठिकाणी उड्डाणपुलांचे बांधकाम सुरू आहे.
महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे उड्डाणपुलांच्या ठिकाणी वाहतूककोंडी आणि अपघातांची संख्या वाढत असल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. महामार्गावरील चारही उड्डाणपुलांची कामे सुरू करून निश्चित वेळ मर्यादेत पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.
वाहतूक प्रभावित
उड्डाणपुलांची कामे सुरू करण्यात आली आहेत. या बांधकामांदरम्यान वाहनांना ये-जा करण्यासाठी महामार्गालगत दोनपदरी पर्यायी मार्ग तयार करण्यात आले होते. परंतु पावसाळ्यात पर्यायी रस्ते खड्ड्यात गेल्याने कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. आता उड्डाणपुलांच्या कामांची रखडपट्टी जोर पकडण्याची शक्यता असताना चारही ठिकाणी वाहतूक प्रभावित होत आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर निर्माणाधीन उड्डाणपुलांची बांधकामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.