

हवामान बदलामुळे रसायनीतील शेतकरी चिंताग्रस्त
कडधान्यांच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता
रसायनी, ता. ३ (बातमीदार) ः रसायनी परिसरात शेतकरी खरिपाच्या हंगामात भाताच्या पिकानंतर दुबार कडधान्यांचे पीक घेतात. यंदाही परिसरात मोठ्या प्रमाणात कडधान्यांचे पीक घेण्यात आले आहे, मात्र फेइंजल वादळामुळे कोकणपट्टीतील हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. या खराब हवामानाचा फटका कडधान्यांच्या पिकाला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
परिसरात शेतकऱ्यांकडून खरिपाच्या हंगामानंतर दुबार कडधान्यांचे पीक घेतले जाते. वाल, चवळी, मुग, मटकी, हरभरा आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. यात वालाचे प्रमाण सर्वाधिक असते. याशिवाय सिंचनाचा आधार असलेले शेतकरी भाताचे आणि भाजीपाल्यांचे पीक घेतात. दरम्यान, यंदाच्या वर्षी खरिपाच्या हंगामात भाताचे पीक चांगले आले होते, मात्र परतीच्या पावसाचा फटका बसल्याने शेतकरी हताश झाले होते. अनेकांचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, भातकापणी आटोपून शेतकऱ्यांनी कडधान्य लागवड केली आहे. मागील काही दिवसांत अनुकूल वातावरण असल्याने वाल, चवळी, मूग आदी प्रकारच्या कडधान्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली, मात्र बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेइंजल वादळामुळे राज्याच्या वातावरणावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे परिसरात मागील तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे, तर अनेक ठिकाणी उकाडा जाणवत आहेत, तसेच हवामान विभागाने पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. खराब हवामान, तसेच पावसामुळे दुबार पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच शेतावरील कापणी केलेल्या भात, पेंढ्याचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी ते रचून ठेवले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.