गरीबाचापाडा येथील कोंडी फुटणार

गरीबाचापाडा येथील कोंडी फुटणार
Published on

गरीबाचा पाडा येथील कोंडी फुटणार
रस्ता रुंदीकरणातील बाधित २५ गाळ्यांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : शहरातील गरीबाचा पाडा येथील श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोल नगरी या प्रस्तावित सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला बाधित होणारे २५ व्यापारी गाळे तोडण्यात आले आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभागाच्या तोडकाम पथकाने सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता.२) ही कारवाई केली. यामुळे आता या मार्गाचे रुंदीकरण होणार आहे. तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

गरीबाचा पाडा येथील श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोल नगरी रस्ता पालिकेच्या टिटवाळा येथून येणाऱ्या वळण रस्त्याला मिळतो; मात्र दोन्ही बाजूंच्या अतिक्रमणांमुळे हा रस्ता २५ ते ३० फूट रुंदीचा झाला आहे. अवजड वाहन येथे आल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या मार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी अतिक्रमणे हटवण्यात यावीत, अशी सूचना एमएमआरडीएकडून पालिका प्रशासनाला करण्यात आली होती; मात्र पालिका ही गोष्ट गांभीर्याने घेत नसल्याने तीन महिन्यांपूर्वी एमएमआरडीएच्या ठेकेदाराने त्या रस्त्यावर खोदकाम करून रस्त्याचे काम सुरू केले होते.

मार्ग असाच अरुंद राहिल्यास भविष्यात येथे मोठी कोंडी होईल. शिवाय रस्त्याचे काम पुन्हा लवकर होणार नाही, यासाठी श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोल नगरी रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते बाळा म्हात्रे, ॲड. गणेश पाटील, अनमोल म्हात्रे, संजय म्हात्रे यांनी घेतली. ॲड. गणेश पाटील यांनी रुंदीकरण न करता या रस्त्याचे काँक्रीटीकरण केले तर उच्च न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका घेतली होती.

नागरिकांचा होणारा विरोध लक्षात घेत ठेकेदाराने श्रीधर म्हात्रे चौकातील काँक्रीटीकरणासाठी खोदलेला रस्ता बुजवून टाकला. जोपर्यंत पालिका या रस्त्यावरील अतिक्रमणे काढत नाही तोपर्यंत या रस्त्याचे काँक्रीटीकरण न करण्याचा निर्णय घेतला. पालिका शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी या रस्त्याचे रुंदीकरण करूनच काँक्रीटीकरण केले जाईल, असे आश्वासन रहिवाशांना दिले.

पोलिसांचा बंदोबस्त
अखेर फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी या काँक्रीट रस्तेकामात अडथळा येणाऱ्या २५ गाळेधारकांना दोन महिन्यांपूर्वी नोटिसा दिल्या होत्या. तसेच आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्याचे सूचित केले होते. सोमवारी सहाय्यक आयुक्त सावंत यांनी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशावरून श्रीधर म्हात्रे चौक भागातील २५ व्यापारी गाळे जेसीबी, तोडकाम पथकाच्या सहाय्याने तोडून टाकले. या कारवाईवेळी विष्णूनगर पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com