

झिका रुग्णांसाठी ३० खाटांचा स्वतंत्र कक्ष सज्ज
ठाणे शहर, ता. ३ (बातमीदार) : राज्यातील काही शहरांत झिका व्हायरसने शिरकाव केला आहे. मुंबईसारख्या शहरांतही या व्हायरसचे लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. अशावेळी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय या व्हायरसचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे. अशा रुग्णांकरिता स्वतंत्र कक्ष निर्माण केला आहे. या कक्षामध्ये आधुनिक सुविधेसह ३० खाटा रिकाम्या ठेवल्या आहेत. तसेच योग्य प्रमाणात औषधसाठा आणि आपत्कालीन पॅरामेडिकल टीमला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.
ठाणे जिल्ह्यात थंडीची लाट येत आहे. त्यातच सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. तसेच मलेरियासारख्या आजाराची लागण झालेले रुग्णदेखील उपचारासाठी येत आहेत. त्याचप्रमाणे पुणे, मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये झिका व्हायरस पसरवणारे डास आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. राज्य आरोग्य यंत्रणेनेदेखील रुग्णालयांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय सतर्क झाले आहे. अशा रुग्णांच्या उपचारासाठी ३० खाटांचा अद्ययावत कक्ष तयार ठेवला आहे.
गरोदर महिलांनी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. मच्छरदाणीसारखी साधने वापरणे आवश्यक आहे. हा डास गरोदर महिलेला चावल्यास त्यातून झालेल्या झिका व्हायरसची बाळाला लागण होण्याची दाट शक्यता असते.
झिका व्हायरसची माहिती प्रसार माध्यमांवर सांगण्यात येत आहे; मात्र ठाणे जिल्ह्यात या प्रकारचा रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही; तरीही खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयात पुरेशी वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम सज्ज ठेवली आहे. विशिष्ट प्रकारच्या डासांमुळे झिका व्हायरस पसरत असून, यामुळे घाबरण्याचे कारण नाही.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, ठाणे
झिका विषाणू एडिस डासामुळे पसरतो. याची प्रमुख लक्षणे ताप, अंगदुखी, डोळे लाल होणे, पोटात दुखणे, अंगावर पुरळे उठणे अशी लक्षणे आहेत. ही लक्षणे दोन ते तीन दिवस दिसल्यास रक्त तपासणी करून वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत. हा आजार घरच्या घरी योग्य काळजी घेतल्यास बरा होतो.
- डॉ. श्रीजीत शिंदे, वरिष्ठ फिजिशियन, सामान्य रुग्णालय, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.