खासगी टँकरचालकांकडून परवाना घेण्यास टाळाटाळ

खासगी टँकरचालकांकडून 
परवाना घेण्यास टाळाटाळ
Published on

भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी टँकरमालकांनी, तसेच पाणी स्रोतांच्या मालकांनी महापालिकेकडून परवाना घेण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. त्यांना परवाना घेणे महापालिकेने बंधनकारक केले आहे, मात्र आतापर्यंत केवळ ११ टँकरमालकांनी, त्याचप्रमाणे चार पाणी स्रोताच्या मालकांनी महापालिकेकडे परवान्यासाठी नोंदणी केली आहे.

मिरा-भाईंदर शहरात असलेल्या खासगी मालकीच्या विहिरी, तलावांचे पाणी टँकरद्वारे नागरिकांना पुरवले जाते. १० हजार लिटर पाणी क्षमता असलेल्या मोठ्या टँकरपासून ते एक हजार लिटर पाणी क्षमता असलेल्या टाक्या बसवलेल्या छोटे टेम्पोद्वारे हा पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेकडून पाणीपुरवठा बंद अथवा शटडाऊन असताना या खासगी टँकरना मोठी मागणी असते. एप्रिल, मेमध्ये या मागणीत प्रचंड वाढ होते. अव्वाच्या सव्वा दर आकारून टँकरमालक नागरिकांना पाणी देतात. शिवाय पाण्याच्या दर्जाचीदेखील खात्री नसते.

ज्या विहिरी अथवा तलावातून हे पाणी पुरवले जाते, त्याच्या पाण्याच्या नमुन्यांचीदेखील कधी तपासणी केली जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासाठी हे पाणी धोकादायक ठरू शकते. साथीचे आजार फैलावण्याची भीतीदेखील असते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने खासगी पाणी स्रोतांची, तसेच खासगी टँकरची महापालिकेकडे नोंद करणे व परवाना घेणे बंधनकारक केले आहे, परंतु या संबंधीचे धोरण निश्चित होऊन दीड महिन्याचा काळ लोटल्यानंतरही शहरातील अवघ्या १५ जणांनी महापालिकेकडे नोंद केली आहे.

महापालिकेकडे नोंद झाल्यानंतर महापालिकेकडून पाण्याच्या स्रोतांसाठी, तसेच खासगी टँकरसाठी शुल्क आकारून परवाना दिला जाणार आहे, मात्र नियमावलीमुळे खासगी टँकरमालक व पाण्याच्या स्रोतांचे मालक महापालिकेकडून परवाने घेण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. मिरा-भाईंदर शहरात अनेक खासगी विहिरी व तलाव आहेत, त्याचप्रमाणे शेकडो खासगी टँकर आहेत, मात्र निवडक जणांनी नोंदणी केली असल्याने महापालिकेच्या धोरणाकडे त्यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे.

खासगी पाण्याचे स्रोत व टँकरला परवाना देण्याचे धोरण महपालिकेने प्रथमच निश्चित केले आहे. जास्तीत जास्त टँकर व पाण्याच्या स्रोतांनी नोंदणी करून परवाना घ्यावा, यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी आणखी काही कालावधी जाणार आहे.
- संजय काटकर, आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com