बदलापूरचा उड्डाणपूल धोकादायक?

बदलापूरचा उड्डाणपूल धोकादायक?
Published on

बदलापूरचा उड्डाणपूल धोकादायक?
व्हीजेटीआयचा धक्कादायक निष्कर्ष

बदलापूर, ता. ३ (बातमीदार) : शहरातील पूर्व व पश्चिमेला जोडणारा एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल हा धोकादायक स्थितीत असल्याचा धक्कादायक अहवाल व्हीजेटीआयने दिल्याची माहिती समोर येत आहे. पुलावर असलेले जॉइंट्स बुजवले आहेत. तसेच पुलावर डांबर आणि पॅचवर्कचे थरच्या थर बसवल्यामुळे हा धोका निर्माण झाला आहे. तसेच पुलावरील वाहतुकीमुळे कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बदलापूर शहरात पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यासाठी २० वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल बांधण्यात आला. हा शहराला जोडणारा एकमेव पूल आहे. पूल उभारण्यात आल्यापासून वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळाला. पूर्व-पश्चिमेला जोडणारा एकमेव पूल असल्याने या ठिकाणी मोठी वाहतुकीची वर्दळ पाहायला मिळते. त्यामुळे दरवर्षी पुलावर असंख्य खड्डे पडतात. त्यानंतर पुलावर पॅचवर्क करून तात्पुरत्या स्वरूपात हे खड्डे बुजवले जातात. सध्यादेखील पुलावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी दोन दिवसांपूर्वी डांबरीकरण करून पुन्हा पॅचवर्क केले आहे; मात्र हे दुरुस्तीचे काम करताना दुरुस्तीबाबत असलेले नियम पायदळी तुडवल्याचा आरोप संभाजी शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या मते २०२२ मध्ये व्हीजेटीआयच्या पथकाने या उड्डाणपुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काम केले होते. या ऑडिटनंतर दिलेल्या अहवालात हा उड्डाणपूल धोकादायक असल्याचे नमूद केले.

काय आहे अहवालात?
बदलापूरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल सिमेंट काँक्रीटच्या स्लॅबपासून बनवला आहे. यामध्ये थर्मल स्टील प्रकारची बांधकाम सामग्री वापरण्यात आली आहे. त्यामुळे पुलावरील जॉइंट्स सुरक्षित राहावेत, यासाठी मोकळे ठेवले जातात. या मोकळ्या ठेवलेल्या जॉइंट्समुळे पुलावरून जात असलेल्या वाहनांचा भार पेलता येतो. तसेच यामुळे उड्डाणपुलाचे आयुष्य वाढण्यास मदत होते; मात्र बदलापुरातील उड्डाणपुलावर खड्डे दुरुस्तीसाठी करण्यात येणारे पॅचवर्क हे एक्सपन्शन जॉइंटवरच केले आहे. जवळपास १० इंचापर्यंत डांबराचे थर या उड्डाणपुलावर चढवण्यात आले आहेत. त्यामुळे हे एक्सपन्शन जॉइंट्स बुजले गेले आहेत. तसेच डांबराच्या थरामुळे उड्डाणपुलाचा भार वाढला आहे. यामुळे पुलाचे आयुर्मान १० वर्षांनी वाढण्यापेक्षा कमी होऊ लागले आहे, अशी माहिती व्हीजेटीआयने अहवालात नमूद केल्याची माहिती संभाजी शिंदे यांनी दिली आहे.

अपघाताची भीती
उड्डाणपुलासंदर्भात व्हीजेटीआयच्या अहवालाकडे कुळगाव बदलापूर नगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे. तसेच या पुलावर डांबराचे थर रचून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवले आहेत. त्यामुळे प्रशासन मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहात आहेत का, असा संतप्त सवाल माजी नगरसेवक आणि भाजपचे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे यांनी उपस्थित केला आहे. तसेच व्हीजेटीआयच्या अहवालानुसार पुलाच्या दुरुस्तीचे काम केले नाही तर उपोषणाचा इशारा संभाजी शिंदे यांनी दिला आहे.

मी नव्याने पालिकेचा कारभार हाती घेतला आहे. त्यामुळे व्हीजेटीआयकडून आलेला अहवाल अभ्यासून घेतो, त्यानंतर उड्डाणपुलाची पाहणी करतो.
मारुती गायकवाड, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com