पिरवाडी समुद्रकिनारा धोकादायक

पिरवाडी समुद्रकिनारा धोकादायक
Published on

पीरवाडी समुद्रकिनारा धोकादायक
बंदिस्‍ती निखळू लागल्याने अपघाताची शक्‍यता; पर्यटकांना सावधानतेचा इशारा
उरण, ता. ३ (बातमीदार) ः उरण तालुक्यातील पीरवाडी समुद्रकिनाऱ्याची दुरवस्था झाली असून बंधाऱ्याचे मोठमोठे दगड निखळू लागले आहेत. त्यामुळे समुद्राच्या लाटांमुळे पीरवाडी किनारा पुन्हा एकदा उद्ध्वस्‍त होण्याची भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. तसेच, पर्यटकांना सावधानता बाळगण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उरणमधील पीरवाडी समुद्रकिनारा आकर्षण ठरत आहे. त्‍यामुळे गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. सुटीच्‍या दिवशी मोठ्या प्रमाणात नवी मुंबईसह मुंबईतील पर्यटक प्रचंड गर्दी करतात. त्याचप्रमाणे या किनाऱ्यावर ओएनजीसीसारखा महत्त्वाचा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. मागील अनेक वर्षांत पावसाळ्यात येणाऱ्या समुद्राच्या प्रचंड लाटांमुळे पीरवाडी किनाऱ्यावरील धूप वाढली होती. त्यामुळे येथील नारळी, पोफळीचे वृक्ष उखडून निघत होते. त्याचप्रमाणे समुद्राचे पाणी नागाव परिसरात शिरत होते. परिणामी, येथील विहिरीत व शेतामध्ये समुद्राचे खारे पाणी जाऊ लागल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. ही समस्या दूर करण्यासाठी पीरवाडी किनाऱ्यावरील बंदिस्ती मजबूत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून किनाऱ्याच्‍या मजबुतीसाठी मोठमोठे दगड टाकून बंदिस्ती करण्यात आली होती; मात्र मागील काही दिवसांपासून यातील अनेक दगड हळूहळू निखळू लागले आहेत. पावसाळ्यात येणाऱ्या मोठ्या लाटांमुळे यात वाढ झाली आहे. त्यामुळे किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांचा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पीरवाडी किनाऱ्यावरील बंदिस्तीचे दगड निखळू नये, याकरिता उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक पर्यटक समुद्रात उतरून समुद्राच्या लाटांचा आनंद घेतात. त्यावेळी एखादा दगड सरकून आल्यास अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
............................
उरण तालुक्यात पीरवाडीचा समुद्रकिनाऱ्यावरील दगड निखळत असल्याने येथे होणारी कामे योग्य पद्धतीने व भ्रष्टाचारविरहित व्हावीत, जेणेकरून कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत. पीरवाडी समुद्रकिनारी लाटांचा जोर मोठ्या प्रमाणात येत असल्याने दगडी निखळत आहेत. त्‍यामुळे बंदिस्‍तीची कामे योग्य प्रकारे करण्यात आलेली नाही. त्‍यामुळे भविष्यात समुद्राचे खारे पाणी पुन्‍हा नागाव व आजूबाजूच्या परिसरात जाण्याची शक्‍यता आहे.
- संतोष पवार, सरचिटणीस, उरण संघर्ष समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com