रस्ते ''दुरुस्ती''ची कोंडी फुटणार

रस्ते ''दुरुस्ती''ची कोंडी फुटणार

Published on

रस्ते ''दुरुस्ती''ची कोंडी फुटणार
प्रत्येकी तीन वॉर्डन तैनात; केडीएमसी प्रशासनाचा निर्णय

शर्मिला वाळुंज
डोंबिवली, ता. ७ : आचारसंहिता संपताच डोंबिवली शहरात रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामाला वेग आला आहे; मात्र एकाच वेळी सर्वच रस्त्यांवर खोदकाम केल्याने वाहतूक कोंडीची डोकेदुखी वाढली आहे. यावरून टीकेची झोड उठताच उशिरा का होईना महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. रस्ते दुरुस्तीची कोंडी फोडण्यासाठी वॉर्डनची फौज रस्त्यावर उतरण्याचा निर्णय एका बैठकीत घेण्यात आला आहे. ज्या ज्या ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत तेथे प्रत्येकी तीन वॉर्डन वाहतुकीला दिशा देण्यासाठी तैनात ठेवण्यात येणार आहेत; मात्र ही अतिरिक्त वॉर्डनची फौज प्रत्यक्षात रस्त्यावर कधी उतरणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच एमएमआरडीएने शहरातील रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात डोंबिवलीत रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची कामे एकाच वेळी एमएमआरडीएमार्फत सुरू केली आहेत. तसेच काँक्रीटीकरणाच्या कामापूर्वी महानगर गॅस विभागाकडून गॅस वाहिनी टाकण्याची कामेदेखील सुरू आहेत. मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यांचीदेखील कामे सुरू आहेत. रस्त्यांची कामे हाती घेतल्याने हे रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. तसेच या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आलेली आहे; मात्र ज्या मार्गांवर आधीच प्रचंड कोंडी होत असते त्याच मार्गावरून ही वाहतूक वळविल्याने कोंडीत आणखी भर पडली आहे. वाहतूक विभागानेदेखील याकडे सुरुवातीपासूनच लक्ष न दिल्याने प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्यावर होत असलेल्या कोंडीने वाहतूक विभागाचाही ताप वाढला आहे. वाहतूक विभागाचे दुर्लक्ष, नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी ‘सकाळ’ने वृत्त प्रसारित करताच झोपलेले वाहतूक विभाग व पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

डोंबिवलीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी शुक्रवारी (ता.६) महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला महापालिकेचे शहर अभियंता, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, कार्यकारी अभियंता तसेच एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता व वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त उपस्थित होते. डोंबिवलीचे आमदार रवींंद्र चव्हाणदेखील ऑनलाइन कॉन्फरन्सद्वारे यात सहभागी झाले होते.

रस्त्यांच्या कामाचे नियोजन करा
आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी एमएमआरडीए अधिकारी, महापालिका अधिकारी व पोलिस विभाग यांच्याकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची सविस्तर माहिती घेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांना या सर्व संस्थांमध्ये समन्वय साधण्याबाबत निर्देश दिले. तसेच या सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन वाहतूक कोंडीची समस्या समजून घेत पर्यायी रस्ते व रस्त्यांच्या कामाचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनादेखील कुठल्या रस्त्यावर खोदकाम करण्याआधी वाहतूक नियंत्रण शाखांना पूर्वसूचना देण्याविषयी सांगितले आहे.

अहवाल सादर करण्याची सूचना
परिमंडळ-२चे उपायुक्त अवधुत तावडे यांना डोंबिवली विभागात होणाऱ्या रस्ते खोदाईच्या अनुषंगाने पाहणी करून विविध संस्थांमध्ये समन्वय राखण्याची सूचना केली आहे. महापालिकेमार्फत पुरविण्यात आलेल्या ट्रॅफिक वॉर्डनच्या रस्तेनिहाय नेमणुकीबाबतचा तपशील सादर करण्याबाबत पोलिस वाहतूक शाखेला सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर आयुक्त डॉ. जाखड यांनी या बैठकीत एमएमआरडीए प्राधिकरणास काम सुरू केलेल्या प्रत्येक रस्त्यावर वाहतूक नियोजनासाठी किमान तीन ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहेत. याला एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंत्यांनी स्वीकृती दर्शविली आहे.

रवींद्र चव्हाण सहभागी
डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र चव्हाण हे ऑनलाइन कॉन्फरन्सद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका प्रशासन, पोलिस वाहतूक शाखा व एमएमआरडीए यांनी समन्वय साधून अतिरिक्त ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

अतिरिक्त ५० वॉर्डनची आवश्यकता
डोंबिवली वाहतूक उपविभागाकडे सध्याच्या घडीला केवळ १६ वॉर्डन आहेत. डोंबिवली शहरात वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी अतिरिक्त ५० वॉर्डनची आवश्यकता आहे. वाहतूक विभागाने त्याविषयी मागणी केली आहे; मात्र अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. स्थानक परिसरातील कोंडी फोडण्यासाठी ६०-७० अतिरिक्त वॉर्डनची आवश्यकता आहे. डोंबिवलीतील कोंडी फोडण्यासाठी पालिका प्रशासनाने एमएमआरडीए प्राधिकरणास वॉर्डनची नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्यक्षात ही पूर्तता कधी होणार, याविषयी मात्र अद्याप काहीही स्पष्टता नाही. त्यामुळे ही कोंडी सुटण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

या मार्गावर कोंडी
डोंबिवलीत शहीद भगतसिंग रोड, टाटा पॉवर लाइन रोड, गोग्रासवाडीतील रस्ते, शिव मंदिराजवळील डॉ. आर.पी. रोड, सावरकर रोड यांसह अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत. शहराच्या पूर्वेला सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे मानपाडा रोड, टंडन रोड, दत्तनगर, प्रगती कॉलेज रोड, टिळक रोड, फडके रोड, पी. पी. चेंबरजवळील रस्ता, टाटा पॉवरलाइन रोड, डॉ. आर. पी. रोड या मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com