टीबीमुक्त बदलापूरसाठी तरुणाचा पुढाकार!

टीबीमुक्त बदलापूरसाठी तरुणाचा पुढाकार!

Published on

टीबीमुक्त बदलापूरसाठी तरुणाचा पुढाकार
स्वखर्चातून दरमहिना पोषण आहार
मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. ७ : क्षयरुग्ण हे आपल्या देशात सर्वाधिक आहेत. बदलापूरसारख्या छोट्याशा शहरातही क्षयरोगाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. वैद्यकीय अहवालाप्रमाणे उपचार आणि सकस आहाराच्या माध्यमातून क्षयरोग बरा होऊ शकतो, असे सांगण्यात येते, तर याच अनुषंगाने टीबीमुक्त बदलापूर करण्याचा ध्यास किरण भोईर या तरुणाने बाळगला आहे. त्यासाठी मागील गेल्या पाच वर्षांपासून किरण भोईर हा बदलापूर शहरातील क्षयरुग्ण दत्तक घेत त्यांना स्वखर्चातून पोषण आहाराचे वाटप करत आहेत. मागील पाच वर्षांत त्यांनी हजारो रुग्णांना मदतीचा हात दिला आहे.

चौथ्या मुंबईकडे वाटचाल करणाऱ्या बदलापूर शहरात साडेचार लाख लोक राहत आहेत. यातील एक हजाराच्या संख्येतील नागरिक हे क्षयरोगग्रस्त आहेत. यातील अनेक रुग्ण हे गरीब आणि मध्यमवर्ग कुटुंबातील आहेत. या सगळ्या रुग्णांना कुळगाव- बदलापूर नगर परिषदेच्या दुबे रुग्णालय आणि त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या ग्रामीण रुग्णालयात मोफत उपचार आणि औषधे दिली जातात; मात्र क्षयरुग्णांसाठी आवश्यक पोषण आहार मिळत नाही. त्यामुळे गोळ्या आणि औषधांसोबत या रुग्णांना पोषण आहार मिळाला तर अनेक रुग्ण यातून बरे होतील. त्यामुळे टीबीमुक्त बदलापूर शहरासाठी आपला हातभार लागेल, या उद्देशाने किरण भोईर यांनी स्वखर्चातून या रुग्णांना पोषण आहार देण्याचे ठरवले.

आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय यांच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत या उद्दिष्टपूर्तीच्या अनुषंगाने कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर बदलापूर शहरातदेखील किरण भोईर हीच संकल्पना राबवत आहे. दुबे आणि ग्रामीण रुग्णालयात क्षयरुग्णांची माहिती घेऊन स्वतः या रुग्णांची भेट घेत त्यांची विचारपूस करत आहेत. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी या माध्यमातून क्षयबाधित रुग्णांना मानसिक आधारदेखील दिला आहे.

पाच वर्षांपूर्वी जेव्हा आपण स्वखर्चातून या रुग्णांना पोषण आहार देण्याचे ठरवले, त्यावेळी त्यांच्या पत्नी डॉ. रचना भोईर यांनीदेखील त्यांना या कामात मोलाची साथ दिल्याचे त्यांनी सांगितले. मदत पोहोचवत असताना एकही रुग्ण मदतीपासून वंचित राहू नये, याकडे त्यांचा कटाक्ष असतो. मागील पाच वर्षांत शहरातील शेकडो रुग्णांना त्यांनी पोषण आहाराचे वाटप केले. यात गहू, तांदूळ, तेल, बाजरी, तूरडाळ, अख्खा मूग, गूळ, सोयाबीन, नाचणी याव्यतिरिक्त इतर अन्नपदार्थ आणि दूध असा पोषक आहाराचा स्रोत असलेले अन्नधान्यांचा यात समावेश आहे.

अनेकदा या रुग्णांना मदत अथवा विचारपूस करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. तर, अनेकदा या रुग्णांसोबत अंतर ठेवले जाते; मात्र किरण भोईर आणि त्यांच्या पत्नी डॉ. रचना भोईर या रुग्णांची संपूर्ण काळजी घेत विचारपूस करतात. त्यांना पोषण आहारासोबतच इतर मदत मिळवून देण्यासाठी कायम प्रयत्न करत आहेत. त्यात हा संपूर्ण खर्च ते स्वतः वैयक्तिकदृष्ट्या करत आहेत.

मदत पोहोचवत असताना माझी पत्नीही या कामात सहभागी झाल्याचा आनंद आहे. त्याचबरोबर आम्ही दोघांनी ही संकल्पना राबवताना अनेक रुग्ण या आजारातून बरे झाल्याचे मानसिक समाधान मिळाले आहे. जमेल त्या पद्धतीने मी ही मदत या गरजू क्षयरुग्णांना पोहोचवत राहणार आहे.
- किरण भोईर, समाजसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com