काजू उत्पादनाकडे लक्ष केंद्रीत

काजू उत्पादनाकडे लक्ष केंद्रीत

Published on

श्रीवर्धन, ता. ७ (वार्ताहर) ः तालुक्यातील आंबा बागायतदारांनी गेल्‍या काही वर्षांत काजू उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्याचे वातावरण काजू पिकाला अनुकूल असून प्रयोगशील बागायतदारांकडून वेंगुर्ला चार व वेंगुर्ला सात या दोन जातींची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. श्रीवर्धन तालुक्यात आंबा लागवडीचे एकूण क्षेत्रफळ हेक्‍टरी २,८७० इतके आहे तर काजू लागवडीचे एकूण क्षेत्रफळ हेक्‍टरी ६४५ इतके आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील काळीभोर माती, लाल मातीचे गुणधर्म व पोषक असे उष्ण व दमट हवामान यामुळे आंबा व काजू या पिकास हे वातावरण अनुकूल आहे. काजूंचे पीक दरवर्षी येतेच; पण काजू कलमांची विशेष निगा राखावी लागते. बागायतदारांकडून वेंगुर्ला चार काजू कलमांची वीस टक्के लागवड तर वेंगुर्ला सात जातीची ऐंशी टक्के लागवड केली आहे. पिवळ्या बोंडाचा रंग असलेली वेंगुर्ला सात जातीच्या एका किलोमध्ये काजू बियांची संख्या शंभर इतकी भरते. बीमधील गराचे प्रमाण एकतीस टक्के इतके आहे. तांबड्या बोंडाचा रंग असलेली वेंगुर्ला चार जातीत एका किलोमध्ये साधारण एकशे चाळीस बिया येतात तर बीमधील गराचे प्रमाणही एकतीस टक्के असते; पण वेंगुर्ला जातीचे काजू फळ आकाराने मोठे येत असल्याने बाजारात त्‍याला जास्त मागणी आहे.
काजू पिकाचे उत्पादन दरवर्षी होते तर आंबा पिकाचे उत्पादन दरवर्षी कमी-जास्त येत असल्याने आंबा बागायतदारांनी काजू उत्पादनाकडे लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. काजूची झाडे खतास चांगला प्रतिसाद देत असली तरी काही वेळेस खराब वातावरणामुळे ढेकण्या, खोड किड्याचा प्रादुर्भाव, फांदीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. रोगांपासून काजू बागायतदारांना झाडांची जपणूक करावी लागते. श्रीवर्धन तालुक्यात आंबा उत्पादनानंतर काजूचे उत्पादन होत असल्याने स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे. तरुणांनी काजू बागायतदारांकडून फळ खरेदी करत फळांवर प्रक्रिया करणारे लघुउद्योग सुरू केले आहेत.

निसर्ग व तौक्‍ते चक्रीवादळानंतर यंदा काजू उत्पन्न चांगले येणार, अशी अपेक्षा आहे. दोन्ही वादळांत काजू झाडे व नव्याने लागवड केलेल्या काजू कलमांचे नुकसान झाले होते. हवामान व निसर्गाने साथ दिली तर या वर्षी उत्पादन चांगले मिळणार आहे.
- हिदायत हुदरूते, काजू बागायतदार, बागमांडला

काजू पिकाच्या लागवडीसाठी फळबाग लागवड योजनेअंतर्गत अनुदान आहे. तसेच, काजू फळ प्रक्रियेसाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत अनुदान आहे. श्रीवर्धन तालुक्यातील काजू बागायतदारांनी सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा.
- श्रद्धा किरण डुंबरे, कृषी अधिकारी, श्रीवर्धन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com