एकाच छताखाली डॉ. बाबाहेबांचा संपूर्ण जीवनपट
वाशी, ता. ७ (बातमीदार) : ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला शुक्रवारी ११ हजार अनुयायांनी भेट देऊन अभिवादन केले. मध्यरात्रीपासून शेकडो आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या होत्या. महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी दादर येथील चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी होती; मात्र ज्या अनुयांयाना चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी जाण्यास जमले नाही, त्यांनी आंबेडकर स्मारकामध्ये येऊन अभिवादन केले. स्मारकाची असणारी भव्यता बघून अनुयायी भारावले होते.
ऐरोली सेक्टर १५ येथील भूखंड क्रमांक २२ (ए) येथे ५,७५० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर नवी मुंबई महापालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक साकारले आहे. या स्मारकामध्ये वर्षभर पालिकेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेण्यात येत असतात. शुक्रवारी महापरिनिर्वारण दिनाचे औचित्य साधून स्मारकामध्ये हजारो अनुयायी हे सहकुटुंब डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले होते. या वेळी प्रशासनाकडून तिथे चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. आंबेडकरी अनुयायांबरोबरच राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांनीदेखील हजेरी लावली होती. स्मारकाचे भव्य प्रवेशद्वार, सुसज्ज ग्रंथालय व त्यातील दुर्मिळ पुस्तके, स्क्रिनवरील डॉ. बाबासाहेबांचा जीवनपट, पोस्टर दालनामध्ये बाबासाहेबांच्या बालपणापासून ते शिक्षण, लग्न, सामाजिक कार्य, पत्रकारिता, राजकारणापासून त्यांच्या अंत्ययात्रेपर्यंत सचित्र माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे एकाच छताखाली डॉ. बाबासाहेबांचा जीवनपट आपल्या डोळ्यात भरतो. शेवटच्या माळ्यावर डोमच्या खाली असणारे ध्यानगृह पाहून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.
---------------
महापरिनिर्वारणदिनी चैत्यभूमी येथे जातो; पण यंदा काही कारणास्तव तेथे जाऊ शकलो नाही. त्यामुळे ऐरोली येथील स्मारकात येऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. स्मारकामधील विद्युत रोषणाई व भव्यता पाहून भारावून गेलो आहे. येथील प्रशस्त हॉल, ग्रंथालय, मेडिटेशन सेंटर बघून आनंद झाला.
- सागर कांबळे, अनुयायी
---------
स्मारकामधील बाबासाहेबांचे आभासी चित्रप्राणलीद्वारे प्रत्यक्ष भाषण अनुभवताना वेगळाचा आनंद मिळाला. बाबासाहेब आपल्यासमोरच बोलत असल्याचे भासत होते. त्याचप्रमाणे न वाचता येणाऱ्या अनुयायांनादेखील ऑडिओच्या माध्यमातून छायाचित्र बघता आले.
- रमेश सूर्यवंशी, अनुयायी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

