‘एआय’मुळे कृषी क्षेत्रात क्रांती

‘एआय’मुळे कृषी क्षेत्रात क्रांती

Published on

सुनील कोकरे : सकाळ वृत्तसेवा
वाणगाव, ता. ७ : पालघर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे अवलंब करणारे आहेत, मात्र सातत्याने बदलते हवामान शेती उत्पादन कमी होण्यास कारणीभूत ठरत आहे. परिणामी शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. वाढत्या लोकसंख्येला पुरेसे अन्न मिळवण्यासाठी बऱ्याच समस्यांना तोंड देत शेतकरी अहोरात्र मेहनत घेत आहेत. यामध्ये हवामान बदल, मजुरांची उपलब्धता, निविष्ठांची कमतरता, यांत्रिकीकरण, तसेच आधुनिक शेतीच्या माहितीचा अभाव, मार्केटिंग आदी समस्या भेडसावत आहेत, त्यावर मात करायला नवनवीन कृषी तंत्रज्ञान विकसित होत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून शेतीचे नियोजन करावे, असे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी सांगितले.

एआय सक्षम प्रणाली हवामानाचा अंदाज दर्शविते, तसेच शेतीचे भविष्यातील निरीक्षण करण्याची क्षमता आहे. उपग्रह आणि ड्रोनद्वारे घेतलेल्या छायाचित्रांच्या संयोगाने तापमान, आर्द्रता, पर्जन्य, वाऱ्याचा वेग आणि सूर्यकिरण यासारख्या माहितीचा वापर करून रोग किंवा कीटक व्यवस्थापन आणि कुपोषित वनस्पतींना अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी शेतांचे मूल्यांकन करते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून स्मार्ट शेतीकडे वळावे, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले.

जॉन माकर्थी यांनी १९५५ मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ही संकल्पना सर्वप्रथम जगासमोर मांडली. बुद्धिमान यंत्रे बनविण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीचा वापर करणे, अशी या तंत्रज्ञानाची व्याख्या त्यांनी केली होती. विशिष्ट कामासाठी तयार करण्यात आलेली ही यंत्रे सभोवतलाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन त्या परिस्थितीशी जुळवून घेते आणि काम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी योग्य कृती करते किंवा निर्णय घेते. माहिती, ज्ञान, नियोजन, अभ्यास, संवादप्रक्रिया, परिणाम आणि नियंत्रण करण्याची क्षमता अशा प्रकारच्या विविध घटकांवर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

हवामान अंदाज घेणे सहज शक्य
सातत्याने बदलते हवामान शेतीला मारक ठरत आहे. गारपीट, दुष्काळ, पूर, उष्णता, थंडीची लाट आदी प्रकारे अनपेक्षित बदल हवामानात होत राहतात. विविध उपग्रहांचे चित्र वापर करून त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापर करून वैज्ञानिक हवामानाचा अंदाज शेतकरी बांधवांना वेळीच पुरविल्यास शेतकऱ्यांना शेतीचे योग्य नियोजन करणे शक्य होईल. परिणामी नुकसान कळेल.

शेतीची पाहणी करणे सहज शक्य
जर्मन आधारित टेक स्टार्टअप पीएटीने प्लँटिक नावाचा एआय आधारित ॲप विकसित केला आहे. ज्यामुळे वनस्पतींमध्ये कीटक आणि रोगांचा समावेश असलेल्या मातीतील पोषक तत्त्वांची कमतरता ओळखता येते. शेतकऱ्यांना पीक संरक्षण आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येते. शेतमाल गुणवत्ता सुधारणे आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान वापरास मदत होते. शेतकरी स्मार्टफोन वापरून वनस्पतींची छायाचित्रे टिपू शकतो.

काटेकोर शेतीसाठी सर्वोत्तम उपाय
कृषी क्षेत्रातील एआय अनुप्रयोगाने साधने विकसित केली आहेत, जी शेतकऱ्यांना पाण्याचे व्यवस्थापन, पीक फिरवणे, वेळेवर काढणी, कीटक प्रादुर्भाव, पोषण व्यवस्थापन याविषयी योग्य मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना अचूक व नियंत्रित शेती करण्यास मदत करतात. पीक टिकून राहण्याचे विश्लेषण करतात आणि तापमान, वारा, वेग आणि सौर किरणे, पर्जन्यवृष्टी यासारख्या डेटा मिळवून शेतात रोग किंवा कीटकांची कमतरता आणि वनस्पतींची कमी पोषण यांचे शेतात मूल्यांकन करतात.

कृषी रोबोटिक्सच्या माध्यमातून किटकांचा अचूक शोध
एआय कंपन्या रोबोट्स विकसित करीत आहेत, ज्या शेती क्षेत्रात सहजपणे अनेक कामे करू शकतात. मानवाच्या तुलनेत जास्त प्रमाणात वेगवान वेगाने तण नियंत्रण करण्यास तसेच रोपांचे पीक नियंत्रित करण्यासाठी या प्रकारच्या रोबोटचे प्रशिक्षण दिले जाते. एआय सिस्टीम उपग्रह प्रतिमा वापरतात. एआय अल्गोरिदमचा वापर करून ऐतिहासिक डेटाशी तुलना करतात. ड्रोन तंत्रज्ञान वापरून टोळधाड नियंत्रणात येऊ शकते. तसेच पीक संरक्षणाबाबतीत शेतकऱ्यांच्या स्मार्टफोनवर सतर्कता पाठवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com