आरोग्य सेवेच्या कमतरतेमुळे पेणवासी त्रस्त
आरोग्य सेवेच्या कमतरतेमुळे पेणवासीय त्रस्त
उपजिल्हा रुग्णालयातील खाटांची संख्या १०० करण्याची मागणी
पेण, ता. ७ (वार्ताहर) : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पेण तालुक्याची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. शिवाय, येथील डोंगराळ भागात आदिवासी वाड्यांची संख्या सर्वाधिक आहे; मात्र आरोग्यसेवा तोकडी असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. येथील उपजिल्हा रुग्णालय सध्या ५० खाटांचे आहे. शिवाय, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने उपचारासाठी पनवेल, मुंबई येथे जावे लागते. त्यामुळे येथील शासकीय रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांसह खाटांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी पेणकरांकडून करण्यात येत आहे.
पेण उपजिल्हा रुग्णालय सध्या अनेक समस्यांनी ग्रासले आहे. डॉक्टरांची कमतरता, दवाखाना तसेच परिसरातील अस्वच्छता, वेगवेगळ्या यंत्रसामग्रीसह रुग्णवाहिकांची कमतरता रुग्णांना सातत्याने भेडसावत आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून पेण शहराची लोकसंख्या वाढली आहे. शिवाय, येथे मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग असून येथे आदिवासी वाड्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे अनेकांना येथील उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते; मात्र रुग्णालयात सध्या ५० खाटा उपलब्ध आहेत. शिवाय, महत्त्वाच्या पदावरील डॉक्टरांची संख्या कमी आहे. पेण शहरातून मुंबई-गोवासारखा महत्त्वाचा महामार्ग गेला आहे. त्यामुळे येथील अपघातातील रुग्णांना पेण शासकीय रुग्णालय जवळ पडते; मात्र तोकडी वैद्यकीय सेवा असल्याने अनेकदा पनवेलमध्ये गंभीर जखमी रुग्णांना हलवावे लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जोखीम वाढते. शिवाय, रुग्णालय व परिसर अस्वच्छ असल्याने दुर्गंधी येते. त्यामुळे एकीकडे गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून जगात ओळख असणाऱ्या तसेच तिसरी महामुंबई म्हणून ओळख होत चाललेल्या पेणच्या उपजिल्हा रुग्णालयाची व्याप्ती वाढविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते हरीष बेकावडे यांनी केली आहे. पेणसाठी १०० खाटांचे रुग्णालय बांधण्यात यावे, या मागणीकरिता मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात येणार असल्याचे बेकावडे यांनी सांगितले आहे.
.............................
पेण हे मुंबई-गोवा महामार्गालगत असून येथे वारंवार घडणारे अपघात तसेच येथील डोंगराळ भागातील आदिवासीबांधव आणि तालुक्यातील खेड्यापाड्यातील गरीब रुग्णांना अनेकदा उपजिल्हा रुग्णालयात समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकदा आम्ही सहकार्य केले आहे. येथील वाढते औद्योगिकीकरण पाहता सरकारने गोरगरिबांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयाची व्याप्ती वाढवून रुग्णांना सर्व आजारांवर मोफत उपचार घेता यावे, याकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे.
- समीर म्हात्रे, कार्याध्यक्ष, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान
................
पेण उपजिल्हा रुग्णालय हे सद्यस्थितीत ५० खाटांचे असून येथे काही समस्या उद्भवत होत्या त्या सर्व समस्या काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाल्या आहेत. येथे डॉक्टर्स, कर्मचारी तसेच ऑपरेशन, एक्स-रे, डिलिव्हरी, औषधे या सुविधा मोफत आहेत; मात्र येथील वाढती रुग्णसंख्या पाहता रुग्णालय १०० खाटांचे व्हावे, याकरिता उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून दोन-तीन वर्षांपूर्वीच पत्रव्यवहार केला आहे.
- पांडुरंग गाडेकर, सहाय्यक अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पेण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

