विकासकामाच्या निविदा होणार पारदर्शक

विकासकामाच्या निविदा होणार पारदर्शक

Published on

विकासकामांच्या निविदा होणार पारदर्शक
आयुक्तांकडून तांत्रिक समिती गठित; विविध आस्‍थापनांतील निवृत्त अधिकाऱ्यांची लागणार वर्णी
वाशी, ता. ७ बातमीदार ः शहरात रस्ते, पदपथ, गटारे, इमारती, नाले तसेच पाणीपुरवठा, मलनिस्सारण, विद्युत अशी विविध प्रकारची नागरी सुविधा कामे करताना विविध विभागांतील प्रमुखांशी चर्चा करून तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर निविदा काढण्यात येतात. या निविदा प्रक्रियेत सुनियोजितपणा व गतिमानता येण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ, निवृत्त शासकीय अधिकाऱ्यांची निविदा शर्ती, पूर्व अहर्ताबाबत तांत्रिक समिती स्थापन केली आहे. यामुळे नागरी सुविधा कामांमध्ये सुनियोजितपणा व पारदर्शकता येणार असून, कामकाजाचा वेगही वाढणार आहे.
कित्‍येक वेळा महापालिकेच्‍या नागरी कामांवर बोट ठेवले जाते. ठेकेदारांकडून निकृष्ट काम केले जात असल्याचा ठपका ठेवला जातो. यामध्ये लाखो, करोडा रुपयांचा चुराडा होतो; मात्र निकृष्ट कामामुळे नागरिकांसह लोकप्रतिनिधींच्‍या रोषाला सामोरे जावे लागते. त्‍यामुळे पालिकेच्या नागरी कामाच्‍या निविदा योग्यपद्धतीने अभ्यास करून काढण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पूर्वी प्रत्येक कामाची निविदा अद्ययावत शासन निर्णयाप्रमाणे शहर अभियंता यांच्या मंजुरीनंतर वृत्तपत्रामध्ये प्रसिद्धीसाठी दिली जात. त्‍यामुळे निविदेच्या कार्यालयीन प्रक्रियेत अधिक सुसूत्रता व पारदर्शकता येण्यासाठी आणि कामाचा वेग वाढवून जलद निपटारा होण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार पूर्ण होण्यासाठी कार्यनियोजन करण्यात आले आहे. त्यास अनुसरून प्रस्तावित कामांचे अंदाजपत्रक व पूर्ण झालेल्या निविदांच्या सर्व बाबी संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत तपासले जाणार आहे. तसेच कार्यकारी अभियंता (प्रकल्प नियोजन) यांच्या अधिकाराखाली असलेल्या उप अभियंता यांनी तपासून व छाननी करून कार्यकारी अभियंता (प्रकल्प नियोजन) यांच्यामार्फत शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्याकडे निविदा मंजुरीसाठी सादर करावयाच्या आहेत. या कामी सुसूत्रता येण्याकरिता व निविदाविषयक कागदपत्रे अद्ययावत करण्याकरिता तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये अनुभवी तज्ज्ञ‍, निवृत्त शासकीय अधिकारी यांची वर्णी लागणार आहे.
.......................
बॉक्स
समितीमध्ये कोण असणार
निवृत्त सचिव किंवा शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आणि समकक्ष मुख्य अभियंता हे समितीचे अध्यक्ष असतील. त्याचप्रमाणे सिडकोचे निवृत्त मुख्य अभियंता आणि महापालिकेचे निवृत्त शहर अभियंता सदस्य तसेच पालिकेचे प्रकल्प नियोजन कार्यकारी अभियंता हे समितीचे सदस्य सचिव असतील, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com