प्रकल्पग्रस्त चौघा भावंडाची फसवणूक

प्रकल्पग्रस्त चौघा भावंडाची फसवणूक

Published on

नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : सानपाडा येथील एक विकसक व त्याच्या सहकाऱ्याने न्हावा गावातील प्रकल्पग्रस्त चौघा भावंडांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रकल्पग्रस्त भावंडांकडून विकासासाठी घेतलेल्या भूखंडावर बांधण्यात आलेल्या इमारतीतील ५० टक्के हिस्सा प्रकल्पग्रस्त भावंडांना न देता, त्यांच्या वाट्याचे १४ फ्लॅट व दोन गाळे परस्पर दुसऱ्याला विकून चौघांची फसवणूक केली आहे. उलवे पोलिसांनी या प्रकरणातील विकसक सुलतान सिराजुद्दीन यासीन व त्याचा सहकारी अर्पित सुशील अगरवाल या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार गणेश कान्हा घरत (६३) व त्यांचे भाऊ देवराम घरत (७२), पद्माकर घरत (६९), नामदेव घरत (६५) हे सर्व न्हावा गावात कुटुंबासह राहण्यास आहेत. या चारही भावंडांची वडिलोपार्जित जमीन सिडकोने संपादित केल्याने २०१० मध्ये त्यांना सिडकोकडून उलवे नोडमध्ये ५०० चौरस मीटरचा भूखंड मिळणार होता. त्यामुळे या चारही भावंडांनी सानपाडा येथील डिव्हाइन डॉल्फिन एन्टरप्रायझेसचा सुलतान सिराजुद्दीन यासीन याच्यासोबत त्यांच्या भूखंडाचा विकसित करण्याचा करारनामा केला होता. भूखंड विकसित करारनाम्यात ६,५०० रुपये प्रतिचौरस फुटाप्रमाणे भाव निश्‍चित करण्यात आला होता. तसेच, त्या भूखंडावर बांधण्यात येणाऱ्या इमारतीमधील ५० टक्के फ्लॅट व गाळे चारही भावंडांना; तर सिराजुद्दीन यासीन याला उर्वरित ५० टक्के हिस्सा देण्याचे करारनाम्यात नमूद करण्यात आले होते. त्यानुसार नोव्हेंबर २०११ मध्ये सिडकोकडून या चारही भावंडांना उलवे सेक्टर १७ मध्ये साडेबारा टक्के योजनेअंतर्गत ५०० चौरस मीटरचा भूखंड मिळाल्यानंतर त्यांनी तो सुलतान यासीन याच्या ताब्यात दिला होता. त्यावेळी सुलतान सिराजुद्दीन यासीन याने या चारही भावंडांना ५० लाख रुपये ऑन जमिनीचा मोबदला दिला होता. तसेच, बांधकाम लवकर पूर्ण करून बांधकामाचा ५० टक्के हिस्सा देण्याचे आश्वासन सिराजुद्दीन याने या चारही भावांना दिले होते.
----------------------
सर्च रिपोर्टमध्ये प्रकरण उघडकीस
ऑक्टोबर २०२३ मध्ये या भूखंडावर इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर चारही भावंडांनी सुलतान सिराजुद्दीन व त्याचा सहकारी अर्पित अगरवाल यांच्याकडे जाऊन करारनाम्याप्रमाणे फ्लॅट व गाळ्यांची मागणी केली असता, त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली. त्यामुळे या चारही भावांना संशय आल्याने त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयातून त्यांच्या भूखंडावर बांधण्यात आलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट या इमारतीचा सर्च रिपोर्ट काढला. त्यानंतर त्या इमारतीतील १४ फ्लॅट व दोन गाळे हे परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चौघांनी न्हावा-शेवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com