ठाण्यात स्वतंत्र जिल्हा आयुष रुग्णालय
ठाणे शहर, ता. ११ (बातमीदार) : ठाण्यात लवकरच जिल्हा आयुष रुग्णालय उभे राहणार आहे. या रुग्णालयात ५० खाटांची सुविधा असणार आहे. आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी, पंचकर्म सेंटर, शिरोधारा, वमन बस्ती यासारखे उपचार सर्वसामान्य रुग्णांना घेता येणार आहेत. आयर्वेद उपचारपद्धतीचा अवलंब करणाऱ्या रुग्णांना सेवेचा चांगला लाभ होणार आहे. आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार, राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत जिल्हा आयुष रुग्णालयाचे काम येत्या काही दिवसांतच सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
वागळे इस्टेट येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात आयुष रुग्णालय बांधण्यासाठी १५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार रुग्णालयाची संरचना, मनुष्यबळ, साधन सामुग्री, औषधी व निवासस्थाने आदींचा सविस्तर कृती आराखडा बनवण्यात आला आहे. तळ अधिक तीन मजली इमारतीत ५० खाटा असणाऱ्या रुग्णालयात योग, प्रतीक्षालय, अभिलेख, प्रक्रिया, मुख्य वैद्यकीय कक्ष, आयुर्वेद कक्ष, होमिओपॅथी कक्ष, युनानी, प्रयोगशाळा, नॅचेरोपॅथी आदी सुविधा उपलब्ध आहेत, तसेच पंचकर्म, क्षारसूत्र आदी उपचार होणार आहेत.
दोन हजार ८१७ चौ. मी. जागेत जिल्हा आयुष रुग्णालय उभे राहणार आहे. तळमजल्यावर बाह्य विभाग (ओपीडी) आणि कार्यालय, पहिला मजल्यावर योग हॉल, कॅन्टीन, गर्भ संस्कार हॉल आहे. दुसऱ्या मजल्यावर पुरुष कक्ष, तर तिसऱ्या मजल्यावर महिला कक्ष, परिचारिका कक्ष आदी असणार आहे.
प्राचीन काळापासून आयुर्वेदातील उपचारपद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकारशक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो. आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी यासारख्या उपचारांनी रुग्णांना आराम मिळतो.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

