कुपोषणाचा फास घटला

कुपोषणाचा फास घटला

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : जिल्ह्यातील कुपोषणाच्या वाढत्या संख्येवरून जिल्हा परिषद प्रशासनावर टीकेची झोड उठविण्यात येत होती, मात्र गेल्या काही वर्षांपासून प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या खाऊचा कोपरा, झोळीमुक्त अभियान, भोंदूबाबांची कार्यशाळा यासारख्या उपक्रमांचा सकारात्मक परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. सप्टेंबरमध्ये तीव्र कुपोषित (सॅम) बालकांची संख्या ८८, तर मध्यम कुपोषित (मॅम) एक हजार २३ होती. नोव्हेंबरअखेर तीव्र कुपोषितांची संख्या २२, तर मध्यम कुपोषित बालकांचे प्रमाण ६२ ने कमी करण्यात यश आले. आता जिल्ह्यात तीव्र कुपोषित गटामध्ये ६६, तर मध्यम कुपोषितांची संख्या ९६१ आहे.

कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने विविध उपक्रम राबवले आहेत. समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशा त्रिसूत्री कार्यक्रमांच्या माध्यमातून शक्य झाले आहे. कुपोषणाचा टक्का कमी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने हा त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील तब्बल एक हजार ६४७ अंगणवाडीतील ८३ हजार ४२७ बालकांसाठी ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली, तसेच दत्तक पालक योजना, पालकसभा घेऊन मुलांचा दिनक्रम, आहाराच्या वेळा, चविष्ठ आणि तितकेच सकस अन्न बालकांना देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे.

पौष्टिक आहारासाठी किट
गरोदरपणात मातेला योग्य सकस आहार न मिळाल्यास बाळ कुपोषित जन्माला येण्याची शक्यता असते, तसेच मूल जन्मल्यानंतर त्याला मातेचे पुरेसे दूध व पोषण आहार न मिळाल्यास ते कुपोषणाच्या विळख्यात अडकू शकते. त्यामुळे गरोदरपणात व प्रसूतीनंतर मातांना, तसेच सहा महिन्यांनंतर बालकांना नियमितपणे अंगणवाडी सेविकांमार्फत पोषण किटचे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात कुपोषित बालकांची घटलेली ही संख्या त्रिसूत्री कार्यक्रमाचे फलित असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

सामाजिक संस्थांचीही मदत
जिल्हा प्रशासनाकडून गरोदर व स्तनदा मातांना बाळंतविडा, कुपोषित मुलांना पोषकवडी, स्तनदा मातांना पाळणा आदी नावीण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याचबरोबर स्नेहा फाउंडेशन, अन्नदा फाउंडेशन यासारख्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने डोळखांब, शहापूर प्रकल्पातील कुपोषित बालकांसाठी कामकाज करण्यात येत आहे. परिणामी प्रतिवर्ष कुपोषित बालकांमध्ये सुधारणा टक्केवारीत वाढ होत आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.

तीन महिन्यांतील कुपोषित बालकांची संख्या
महिना तीव्र कुपोषित मध्यम कुपोषित
सप्टेंबर ८८ १,०२३
ऑक्टोबर ७६ १,००९
नोव्हेंबर ६६ ९६१

कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने मुंबई आयआयटी या नामांकित संस्थेचादेखील सहभाग घेण्यात आला. बालकांची काळजी घेण्यासाठी व्हिडिओमार्फत, तसेच पालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत आहे.
- संजय बागुल,
जिल्हा कार्यक्रम अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com